(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
पाथर्डी – प्लॉट विक्रीतून मिळालेले पैसे घेऊन जाणाऱ्या दीपक सुधाकर येळाई (वय ६२, रा. क्रांती चौक, पाथर्डी) यांच्यावर लोखंडी सुरा आणि कुकरीचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैशांची बॅग लुटणाऱ्या टोळीतील चार आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी एकच्या सुमारास दीपक येळाई हे प्लॉट विक्रीतून मिळालेले पैसे घेऊन क्रांती चौक येथे जात होते. त्यावेळी दोन विनाक्रमांकाच्या मोटारसायकलींवरून आलेल्या चार अनोळखी आरोपींनी त्यांच्या हातावर लोखंडी सुरा मारला. त्यानंतर कुकरीचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैशांची बॅग जबरीने चोरून नेली. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६) आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव आणि पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, अतुल लोटके, रणजीत जाधव, बाळासाहेब खेडकर, योगेश कर्डीले, किशोर शिरसाठ व प्रशांत राठोड यांचे पथक तयार केले. या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला.
१२ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, या गुन्ह्यातील संशयित मुदस्सर उर्फ मुज्जु सादिक सय्यद हा माणिकदौंडी रोडवरील एम.एम. निऱ्हाळी हायस्कूलजवळ असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सुरज संतोष वडागळे (रा. बेल्हेकरवाडी रोड, सोनई), आकाश शरद हराळे (रा. सोनई, ता. नेवासा) आणि इसाक पापा शेख (रा. दुलेचांदगाव, ता. पाथर्डी) यांना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले.
तपासादरम्यान मुदस्सर उर्फ मुज्जु सय्यद याने चोरीच्या रकमेतून आपल्या वाट्याला दोन लाख रुपये आल्याचे सांगितले. त्यापैकी ३० हजार रुपये खर्च केले असून उर्वरित रक्कम घरी ठेवल्याची माहिती दिली. तसेच विशाल ब्राम्हणे याला ७० हजार रुपये मिळाल्याचे, तर उर्वरित रक्कम साहिल खान आणि राजू ठाकूर यांच्याकडे असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष एक लाख ७० हजार रुपये रोख रक्कम, एक पिशवी आणि दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या गुन्ह्यात साहिल खान (रा. तिसगाव, ता. पाथर्डी), राजू ठाकूर (रा. दिल्ली), विशाल ब्राम्हणे (रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा) आणि सोमनाथ रमेश काळोखे (रा. पाथर्डी) यांच्यासह इतर साथीदारांचा सहभाग असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यातील काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे पाथर्डीतील लुटीच्या गुन्ह्याचा तपास पुढे सरकला आहे.