
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
वाकडी – जय मल्हार क्रिकेट क्लब, वाकडी आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत क्रिकेटप्रेमींना सेमीफायनल आणि फायनल सामन्यांचा थरार अनुभवता आला. स्पर्धेतील सेमीफायनल फेरीत वाकडी, दत्तनगर आणि सावळीविहीर या संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.
वाकडी आणि सावळीविहीर संघांदरम्यान झालेला सामना विशेष रंगतदार ठरला. दुसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक लढतीत वाकडी संघाने थरारक विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या अंतिम सामन्यात सावळीविहीर संघाने उत्कृष्ट खेळ करत जय मल्हार वाकडी संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी सावळीविहीर संघाला प्रदान करण्यात आली. या पारितोषिकासाठी श्री अण्णासाहेब पा. कोते यांनी रु. २१,१११ चे सौजन्य दिले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक व ट्रॉफी जय मल्हार वाकडी संघाला देण्यात आली. यासाठी श्री विनोदभाऊ लहारे यांनी रु. १५,१११ चे सौजन्य दिले. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक व ट्रॉफी दत्तनगर संघाला प्रदान करण्यात आली असून त्यासाठी श्री प्रसादभाऊ लहारे यांनी रु. ७,१११ चे सौजन्य दिले.अंतिम सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सावळीविहीर संघाचा युवा खेळाडू रोहन जगताप याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले. विजेतेपदानंतर खेळाडूंनी डीजेच्या तालावर जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला.
या पारितोषिक वितरण कार्यक्रमास डॉ. निलेश कोते, गणेश लहारे, निलेश लहारे, प्रमोद गोरे, भारत लहारे, सोन्याबापू आहेर, महेश जाधव, अमोल शेळके, सतीश आहेर, किशोर कोते, राजूभाऊ लहारे, महेश लहारे, नानाभाऊ खजिनदार, राहुल पांडागळे, आदित्य लहारे, हरिदास खरात आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजक समितीच्या वतीने सर्व बक्षीसदाते मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जय मल्हार क्रिकेट क्लब व आदर्श क्रिकेट क्लब, वाकडीच्या सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व खेळाडू, ग्रामस्थ, क्रिकेटप्रेमी नागरिक, बक्षीसदाते आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.




