
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागातंर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा – २०२४-२५” स्पर्धेच्या टप्पा दोन मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला. अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल पंचायत समिती राहाता येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते शाळेच्या प्राचार्यांना प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपयेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या पथदर्शी अभियानात अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शाळांनी आपला सहभाग नोंदवला. प्रत्येक शाळेचे निर्धारित केलेल्या मानकांनुसार मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये प्रवरा पब्लिक स्कूलचा हिरवाईंनी नटलेला परिसर, स्वच्छ आणि सुंदर मैदाने, शाळेच्या बोलक्या भिंती, जलशुद्धीकरण प्रकल्प, औषधी वनस्पतींची परसबाग शाळेचे अद्ययावत कार्यालय व महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद, पर्यावरणपुरक व वृक्षांचे संवर्धन करणारा कर्तव्यदक्ष सेवकवृंद इत्यादी बाबतीत प्रवरा पब्लिक स्कूल हे अग्रेसर ठरले. अहिल्यानगर जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवून प्रवरा पब्लिक स्कूलने आपले वेगळेपण सिद्ध केले. शाळेचे प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे, उपप्राचार्य श्री के टी अडसूळ, पर्यवेक्षिका सौ एम एस जगधने, सौ शुभांगी रत्नपारखी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुरस्कार प्राप्त करण्यासाठी विशेष योगदान दिले.
प्रवरा पब्लिक स्कूलने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा.डाॅ.सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिक विभागाचे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.
