स्नेहालय संस्था अहिल्यानगर

गुढीपाडवा चित्र शोभायात्रेत झलकला स्नेहालय उडान प्रकल्पाचा उडान जागृती चित्ररथ!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

अहिल्यानगर – गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा शुभारंभ दर्शवणारा सण असून, तो महाराष्ट्रात विशेष उत्साहाने साजरा केला जातो. हा सण नवचैतन्य, समृद्धी आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी घरासमोर गुढी उभारून तिची पूजा केली जाते. तसेच विविध ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर “यात्रा स्वाभिमानाची, नगरच्या अभिमानाची” या विषयावर आधारित गुढीपाडवा चित्र शोभायात्रेचे आयोजन केले होते.ही शोभायात्रा भिगारवाला चौक, एम.जी. रोड, कापड बाजार, तेलीखुंट चौक, नेता सुभाष चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा या मार्गाने काढण्यात आली. या भव्य शोभायात्रेत स्नेहालयच्या उडान प्रकल्पाच्या वतीने ‘उडान जागृती चित्ररथ’ साकारण्यात आला, जो ‘बालविवाह मुक्ती मिशन’ या विषयावर आधारित होता.

 

स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्प अंतर्गत बालविवाह रोखण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जातात. बालविवाह हा मुलींच्या शिक्षणास आणि त्यांच्या सर्वांगीण विकासास अडथळा ठरतो. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून जनजागृती करून, मुलींना शिक्षण, सुरक्षितता आणि स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरित करण्याचे कार्य केले जाते. अहिल्यानगर जिल्ह्याला 31 डिसेंबर 2027 अखेर आणि नगर तालुक्याला 25 डिसेंबर 2025 अखेर बालविवाह मुक्त करण्याचे ध्येय उडान प्रकल्पाने ठेवले आहे.

 

नवीन वर्षाच्या निमित्ताने उडान प्रकल्पाने एक नवीन संकल्प केला आहे – ‘एकही बालविवाह होऊ द्यायचा नाही!’ या अंतर्गत प्रत्येक गावात आणि शाळांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी स्थानिक प्रशासन, शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्याशी समन्वय साधून अधिक प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत. मुलींना शिक्षण आणि स्वावलंबनाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे, समुपदेशन आणि प्रोत्साहनपर उपक्रम आयोजित केले जातील. हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व समाज घटकांनी हातभार लावण्याचे आवाहन उडान प्रकल्पाने केले आहे.

 

स्नेहालय संस्थेच्या मानद संचालक वैशाली चोपडा यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली ‘उडान जागृती चित्ररथ’ साकारण्यात आला. यासाठी बालभवन, अनाम प्रेम, रेडिओ नगर 90.4 FM, युवा निर्माण प्रकल्प यांनी विशेष सहकार्य केले. चित्ररथात बालविवाहाचे दुष्परिणाम, शिक्षणाचे महत्त्व, आणि समाजाने यामध्ये बजावायची भूमिका याविषयी माहिती दिली गेली.

 

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम, सोशल वर्कर शाहिद शेख, शशिकांत शिंदे, समुपदेशक प्रिया मते, अनामप्रेम चे रामदास काकडे, रोहित लाटे, आणि उडान चे बालमित्र यांनी अथक परिश्रम घेतले.नगरकरांनी या शोभायात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला. स्नेहालयच्या उडान प्रकल्पाच्या या उपक्रमामुळे बालविवाह रोखण्याच्या चळवळीला आणखी बळ मिळाले असून, नव्या पिढीला उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!