
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने “ग्रामीण भागातील उत्कृष्ठ महाविद्यालय” म्हणून तिस-यांदा गौरविलेल्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये नुकत्याच एच.डी.एफ.सी. बँक, कोटक महेंद्रा या नामांकित बँकांच्या वतीने परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतीमध्ये १०२ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी मिळाली ही अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे महाविद्यालयाचे कॅम्प संचालक डॉ. आर.ए. पवार यांनी सांगितले.
शिक्षण हे ग्रामीण परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे या विचार धारेवर गरीब, गरजू व होतकरु विद्यार्थी-विद्यार्थीनींना कालसुसंगत व दर्जेदार उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देऊन त्यांचे जीवनमान समृध्द आणि उन्नत व्हावे या उद्देशाने सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेअंतर्गत १९७१ मध्ये सुरु करण्यात आलेल्या या महाविद्यालयामध्ये आज तीन हजार विद्यार्थी विविध विषयांमध्ये ज्ञानार्जन करीत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नोकरी आणि स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न होत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कौशल्य आधारीत प्रशिक्षणे त्याचबरोबर पुस्तकी ज्ञानाबरोबरच ग्रामीण विद्यार्थी हा परिपूर्ण व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्र प्रक्षेञ भेटी, प्रत्यक्ष कृती द्वारे शिक्षण, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना बदलत्या शिक्षणाचा आणि औद्योगिक क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या कौशल्यांची माहिती दिली जाते. कमवा शिकवा योजना आणि विविध शिष्यवृत्ती या माध्यमातून शिक्षणासाठी पाठबळ दिले जाते यामुळे आज ग्रामीण विद्यार्थी हा प्रवरेच्या माध्यमातून अव्वल स्थानावर आहे. याशिवाय माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देखील वेळोवेळी आवश्यक असलेली माहिती त्यांना उपलब्ध होत असल्याने नोकरीची मोठी संधी या महाविद्यालयांमध्ये निर्माण झाली आहे. महाविद्यालय आणि संस्था पातळीवरती विविध सामजस्य करार असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी हे आज शहरी भागामध्ये चांगल्या प्रकारची नोकरी करून आपली स्वप्ने पूर्ण करीत करीत आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच पोलिस भरती व आर्मी भरती पूर्व तयारी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत मार्गदर्शन केले जाते. याचेच फलित आज दिसून येत आहे. महाविद्यालयामध्ये परिसरातील बेरोजगार व शाळाबाह्य युवकांबरोबरच महाविद्यालयीन तरुण-तरुणींना रोजगारक्षम व्यावसायिक अभ्यासक्रमांचे ज्ञान संपादन करता येते असे डॉ. पवार यांनी सांगितले.
मुलाखती यशस्वी करण्यासाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचे कन्व्हेनर प्रा. मनोज परजणे, महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे डॉ. हरिभाऊ डुबे, एकनाथ सरोदे,अप्पासाहेब शेळके यांनी परिश्रम घेतले.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी माजी खा.डॉ. सुजय विखे पाटील,अभिमत विद्यापीठाचे कुलपते डॉ. राजेंद्र विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. सुश्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदिप दिघे यांनी अभिनंदन केले आहे.
