धार्मिकमहाराष्ट्र

नववर्षाच्या प्रारंभी श्री.क्षेत्र जळगाव ते श्री.क्षेत्र शिर्डी भव्य पायी दिंडीचे आयोजन;जळगावकर झाले साईचरणी नतमस्तक

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – नववर्षाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे या वर्षी जळगाव ते श्रीक्षेत्र शिर्डी भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन छत्रपती धर्मवीर संभाजी राजे मित्र मंडळ व जळगावकर ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार (दि. 1 जानेवारी) रोजी भक्तिमय वातावरणात करण्यात आले.2026 नववर्षाच्या सुरुवातीलाच जळगाव येथील समस्त साईभक्त साईनगरी शिर्डीत साईबाबांच्या चरणी लीन झाले.

जळगाव येथील छत्रपती धर्मवीर संभाजी राजे मित्र मंडळ चौकापासून सकाळी सात वाजता ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज मंदिर व श्री महादेव मंदिर येथून श्री साईबाबांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या आयोजित दिंडी सोहळ्यात जळगाव परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने साईरामाच्या गजरात अत्यंत भक्तिभावाने सहभागी झाले होते. लहान मुले, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.

श्री.साईबाबांच्या पालखीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती, तर पालखीत साईबाबांचा फोटो विराजमान करण्यात आला होता.यावेळी समस्त साईभक्तांनी ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज, हर हर महादेव तसेच ‘ॐ साईराम’, ‘जय साईराम’, ‘जय श्रीराम’ असा जयघोष केल्याने संपूर्ण जळगाव परिसर भक्तिमय झाला.

यावेळी श्री महादेव मंदिर परिसरात समस्त ग्रामस्थ मोठ्या भक्तीभावाने उपस्थित होते. सर्व भाविकांनी महादेव मंदिरात एकत्र येत श्री साईबाबांची आरती केली व साईनामाचा जयघोष करत जळगाव येथून फटाक्यांच्या आतषबाजीत, वाजत-गाजत निघालेली ही पालखी मिरवणूक श्रीक्षेत्र शिर्डीकडे मार्गस्थ झाली.

दिंडीतील भाविक भक्तांसाठी जळगाव-शिर्डी मार्गावर विविध ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.तसेच श्रीक्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी लीन झाल्यानंतर आयोजकांच्या वतीने साई मंदिरात दर्शनाची तसेच भाविकांसाठी प्रसादालयात प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!