गुन्हेगारीबालविवाह प्रतिबंधस्नेहालय संस्था अहिल्यानगर

अल्पवयीन मुलीच्या बालविवाह प्रकरणात उडान प्रकल्प व पोलीस प्रशासनाची प्रभावी कारवाई

अल्पवयीन मुलीचे लग्न जमवणाऱ्यासह पती, सासू, आई-वडील आणि नातेवाईकांवर गुन्हा दाखल

(अहिल्यानगर खबरबात वृतसेवा)

 

अहिल्यानगर- (ता. २८) अल्पवयीन मुलीच्या बालविवाहाचा आणि तिच्यावर होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्नेहालयच्या उडान प्रकल्पाच्या मदतीने पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत जमवणाऱ्यासह पती, सासू, आई-वडील, आणि नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीने स्नेहालय संस्थेच्या स्नेहधार प्रकल्पाकडे तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर ही घटना समोर आली. तपासादरम्यान ती फक्त १७ वर्षांची असल्याचे स्पष्ट झाले, यानंतर तातडीने उडान हेल्पलाईनला माहिती देण्यात आली. उडान प्रकल्पाच्या मानद संचालक ॲड.बागेश्री जरंडीकर व प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी पिडीत मुलीला आधार देऊन समुपदेशन करून सर्व हकीकत जाणून घेतली. सविस्तर माहिती अशी की, ११ जुलै २०२४ रोजी पीडित मुलीचा विवाह झाला होता.

मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही, तिच्या कुटुंबीयांनी आणि विवाह जमवणाऱ्यांनी हा विवाह घडवून आणला. विवाहानंतर, तिच्या पतीने तिच्यावर वेळोवेळी शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली. त्याच्या दारूच्या व्यसनामुळे तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. सासूने घरातील जबाबदाऱ्या लादून तिचे शोषण केले, तर सासरच्या मंडळींनी वडिलांकडून आर्थिक फसवणूक केली. या बाबी विचारात घेऊन ताबडतोब स्नेहालयच्या उडान प्रकल्पाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तोफखाना पोलीस स्टेशनला अहवाल सादर केला. पोलीस, महिला व बालविकास विभाग, ग्रामपंचायत अधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाशी समन्वय साधत आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याकरिता आवश्यक पुरावे गोळा करून पीडित मुलीला संपूर्ण मदत केली.

पीडित मुलीने स्वतः फिर्याद देत बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत कलम ९, १०,११, भारतीय दंडसंहिता २०२३ च्या कलम ६४(२)(m) आणि ११५(२), तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ (POCSO) अंतर्गत कलम ४, ६, ८ आणि १२ याअंतर्गत पती, सासू, मुलीचे आई-वडील, तसेच विवाह जमवणारे नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची मेडिकल करून तिला तात्पुरता निवारा बाल कल्याण समिती यांच्या परवानगीने शासकीय बाल गृह येथे देण्यात आला आहे. स्नेहालयच्या उडान प्रकल्पाचे सोशल वर्कर शाहिद शेख, सीमा जुनी,पूजा दहातोंडे यांनी नागरिकांना बालविवाहासंदर्भात सतर्क राहण्याचे आणि अशा घटनांना वाचा फोडण्याचे आवाहन केले आहे. बालविवाहासारख्या घटना त्वरित पोलीस (११२) चाईल्ड हेल्पलाईन (१०९८), किंवा उडान हेल्पलाईन (९०११०२६४९५) वर नोंदवाव्यात. तुमची माहिती पूर्णतःगोपनीय ठेवली जाईल.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!