
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – चितळी (ता.राहाता) येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक आगळा-वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम पार पडला. विशेष बाब म्हणजे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय नामदेव शिरसाठ सर यांनी पारंपरिक प्राचार्यच्या भूमिकेपलीकडे जात स्वतः योग शिक्षकाची जबाबदारी पार पाडत विद्यार्थ्यांना थेट योगासने शिकवली.
या योग कार्यक्रमात एकूण ९६० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. यामध्ये माध्यमिक विभागातील ७४० व उच्च माध्यमिक विभागातील २२० विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्राचार्य शिरसाठ सरांनी योगासने व प्राणायामाचे सादरीकरण करत त्यांचे आरोग्यदायी फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांच्या प्रात्यक्षिकांनी विद्यार्थी भारावून गेले.
या कार्यक्रमात कपालभाती,अनुलोम-विलोम, वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन, भुजंगासन, वज्रासन, शवासन, हास्यासन आदी योगासने व पूरक हालचाली विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या गेल्या. या सत्रात विद्यार्थी, शिक्षक, सेवक व महिला कर्मचारी वर्गानेही मनापासून सहभाग नोंदवत एकात्मतेचा अनुभव दिला.
आयोजित संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. अरुण झूराळे सर यांनी अतिशय नेटकेपणाने केले.पर्यवेक्षिका सौ.सातव मॅडम, शिक्षकगण व सर्व सेवक बंधू-भगिनींनी कार्यक्रमाच्या यशात मोलाचे योगदान दिले.यावेळी समारोपप्रसंगी क्रीडा शिक्षक अरुण झूराळे यांनी सर्वांचे आभार मानले. योग हा फक्त व्यायाम नसून तो आरोग्य, मनःशांती व एकाग्रतेचा शाश्वत मार्ग असल्याचे त्यांनी अधोरेखित करत नियमित योगसाधना करण्याचे आवाहन केले.
