(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) तुटपुंजी वाढ करून दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा घात केला असल्याचा आरोप अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
यंदा दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिके जळून गेली आहेत. रब्बी हंगामातही पिकांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नाही. दुसरीकडे बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून शेतीचा उत्पादन खर्च पाचपट वाढल्याचे शेळके यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने रब्बी पिकांच्या हमीभावात केलेली वाढ शेतकऱ्यांसाठी अत्यंत तुटपुंजी असल्याची टीका त्यांनी केली.
केंद्र सरकारने गव्हाच्या हमीभावात प्रतिक्विंटल २५ रुपयांची वाढ करून तो २ हजार ६१० रुपये केला आहे. हरभऱ्याच्या हमीभावात ८३ रुपयांची वाढ करून तो ५ हजार ९२८ रुपये, तर जवारीच्या हमीभावात १३६ रुपयांची वाढ करून तो २ हजार २८५ रुपये करण्यात आला आहे. शेतीचा वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता ही वाढ शेतकऱ्यांना परवडणारी नसल्याचे शेळके यांनी म्हटले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करताना त्यांनी लोकप्रतिनिधींनाही सवाल केला आहे. अनेक लोकप्रतिनिधी स्वतःला शेतकरी असल्याचे सांगतात. मग हमीभावातील ही तुटपुंजी वाढ चुकीची आहे, हे ते सरकारला का सांगत नाहीत? कृषी मूल्य आयोगामध्ये सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी असतानाही शेतमालाचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च त्यांना माहीत नाही का? त्यांना लाखो रुपये मानधन दिले जाते, मग शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल शेळके यांनी उपस्थित केला.
यंदा जागतिक बाजारपेठेत साखरेचा तुटवडा असल्याने साखरेचे दर प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे सांगताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शेतकरी संघटनेच्या वतीने उसाला प्रतिटन ५ हजार रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही या मागणीसाठी आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच साखर कारखान्यांनी साखरेची निविदा (टेंडर) प्रतिक्विंटल ५ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दराने विकू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे. मात्र, या प्रश्नावर साखर कारखानदार मौन बाळगून असल्याची टीका शेळके यांनी केली.शेतकऱ्यांनी आता जागृत होऊन आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघटित होण्याची गरज आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकजुटीने संघर्ष केल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे आवाहनही विठ्ठलराव शेळके यांनी केले आहे.