अहिल्यानगर जिल्हा

डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ७२ वर्षीय महिलेच्या पोटातून १५ किलो वजनाची गाठ यशस्वीरीत्या काढली

अवघ्या तीन तासांत आव्हानात्मक शस्त्रक्रिया; रुग्णाची प्रकृती उत्तम

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालय, अहिल्यानगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने एका ७२ वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल १५ किलो वजनाची अंडाशयाची मोठी गाठ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या काढून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आलेली ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया सुमारे तीन तास चालली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती अतिशय चांगली असून तिच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली आहे.

सदर महिला रुग्णाच्या पोटामध्ये मोठ्या आकाराची गाठ तयार झाली होती. या गाठीमुळे पोटावर मोठा ताण निर्माण होऊन रुग्णाला श्वास घेण्यास, लघवी करण्यास तसेच शौचास जाण्यास त्रास होत होता. गाठीचा आकार वाढल्यामुळे रुग्णाच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत होता. तपासणीनंतर ही अंडाशयाची गाठ असल्याचे निदर्शनास आले. गाठीचा प्रचंड आकार आणि तिची इतर अवयवांशी झालेली चिकटण ही शस्त्रक्रियेतील प्रमुख आव्हाने होती.

या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. अद्वैत वैद्य (कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ) आणि डॉ. दीपक गाडेकर (मूत्रविकार तज्ञ) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शस्त्रक्रियेदरम्यान गाठ आजूबाजूच्या इतर अवयवांना चिकटलेली असल्याने विशेष काळजी आणि कौशल्याची आवश्यकता होती. रुग्णाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत डॉक्टरांच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने शस्त्रक्रिया पूर्ण केली आणि सुमारे १५ किलो वजनाची गाठ यशस्वीरीत्या काढण्यात आली.

वृद्ध वयातील रुग्ण, गाठीचा मोठा आकार आणि इतर अवयवांशी असलेली चिकटण या सर्व बाबी लक्षात घेता ही शस्त्रक्रिया वैद्यकीयदृष्ट्या आव्हानात्मक होती. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य, योग्य उपचारनियोजन आणि रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती अतिशय चांगली असल्याने रुग्णालयातील डॉक्टर व उपचार पथकाने समाधान व्यक्त केले.

माननीय नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने रुग्णालयात सुपर स्पेशलिटीच्या सोई सुविधा गोरगरिबांसाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार आणि गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.

अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडणे हे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची कार्यक्षमता, वैद्यकीय अनुभव आणि रुग्णकेंद्रित उपचारपद्धतीचे द्योतक आहे. समाजातील सर्व स्तरांतील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या रुग्णालयाच्या प्रयत्नांना या यशामुळे आणखी बळ मिळाले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!