
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर- महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील पतसंस्था क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दीर्घकाळ या पदावर कार्यरत असलेल्या कोयटे यांच्या या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले आहे.
नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटू लागले होते. आर्थिक गैरव्यवहार, संशयास्पद व्यवहार आणि विविध संबंध समोर येत गेल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढत गेली आणि अनेक संबंधितांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
समता पतसंस्थेशी अशोक खरात यांचे संबंध समोर आल्यानंतर काका कोयटे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे दबाव वाढू लागला. पतसंस्थेच्या कामकाजातील पारदर्शकतेबाबत सभासदांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरली होती.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वाद अधिक चिघळू नये आणि संस्थेची प्रतिमा अबाधित राहावी, यासाठी काका कोयटे यांनी अखेर अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे समजते. त्यांच्या या निर्णयामुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनअंतर्गत सुमारे १५ हजार पतसंस्था कार्यरत असून, या घडामोडींचा परिणाम संपूर्ण सहकार क्षेत्रावर होणार असल्याचे मानले जात आहे. पुढील काळात या प्रकरणाची चौकशी, तसेच नव्या नेतृत्वाची निवड याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




