
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – प्रवरानगर येथील धनंजय गाडगीळ सभागृहात प्रवरा परिवाराच्या वतीने एक हृदयस्पर्शी गेट-टुगेदर आयोजित करण्यात आला. या सुंदर संमेलनाने प्रवराच्या मजबूत परंपरेला आणि आपुलकीच्या नात्यांना नवे बळ दिले. अनेक वर्षांपासून संस्थेशी जोडले गेलेले कर्मचारी, पदाधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या संधीचा मनमुराद आनंद घेतला. प्रवरा परिवार म्हणजे केवळ एक संस्था नव्हे, तर एक जिवंत, प्रेमळ, एकत्र राहणारा मोठा कुटुंब आहे, हे या कार्यक्रमाने पुन्हा अधोरेखित केलं.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मविभूषण डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, स्व. बाळासाहेब विखे पाटील आणि स्व.सिंधुताई विखे पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी डॉ. सुजयदादा विखे पाटील आणि त्यांच्या बहिणी सुस्मिता विखे पाटील यांनी उपस्थितांसोबत फुगडी खेळून क्षणात मैत्रीचा, प्रेमाचा, आणि आत्मीयतेचा सुवास पसरवला. प्रवरा परिवाराच्या प्रमुख सदस्यांचा असा सहज आणि उबदार वावर पाहून प्रत्येकाला “हे आपलेच घर आहे” असे वाटले. त्यांच्या सहभागामुळे सभागृहातील वातावरण एक वेगळीच ऊर्जा घेऊन भरून आलं.
गेट-टुगेदरमध्ये हास्य, आनंद, गप्पा आणि आठवणींचे रंग भरले गेले. प्रवरा परिवारातील प्रत्येकाने आपल्या उपस्थितीने या क्षणांना अविस्मरणीय बनवलं.नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी असा आत्मीय संवाद फार महत्त्वाचा असतो, हे या संमेलनातून सिद्ध झाले. यावेळी डॉ. सुजयदादा विखे पाटील व सुष्मिताताई विखे पाटील यांनी प्रवरा परिवारातील सर्व सदस्यांसमवेत सेल्फी काढत आनंद उत्सव साजरा केला. झिंगाट गाण्याच्या तालावर सर्व कर्मचाऱ्यांनी ठेका धरत प्रवरा परिवाराचा गेट-टुगेदर मोठ्या उत्साहात रंगवला यावेळी सर्व सदस्यांनी डॉ. सुजय दादा विखे पाटील यांना खांद्यावर उचलून घेत मोठा जल्लोष साजरा केला.
लहानांपासून वयोवृद्ध सदस्यांपर्यंत प्रत्येकाने आपलेपणाने सहभाग घेतला. जुन्या आठवणींना उजाळा देत, नव्या ओळखी जोडत, एकत्रित हास्य आणि आनंदाचे क्षण साजरे करत प्रवरा परिवाराने एक सुंदर संस्कृती जपली आहे हे पुन्हा एकदा ठसवून सांगितलं. हा कार्यक्रम म्हणजे एकत्रतेचा उत्सव होता जिथे प्रत्येक हसरा चेहरा ‘आपण प्रवरेच एक कुटुंब आहोत’ हे सांगत होता.
