
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे दिनांक १३ मे २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टी व वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक कुटुंबांवर संकट कोसळले आहे. यामध्ये धामोरी येथील सौ. सुनीता प्रकाश कांबळे यांच्या कुटुंबालाही मोठा आर्थिक व मानसिक धक्का बसला.
दोन वर्षांपूर्वी त्यांनी संजीवनी महिला बचत गटाच्या माध्यमातून कमळा महिला बचत गटाकडून ६० हजार रुपयांचे कर्ज घेऊन गाय खरेदी केली होती. त्या गायीच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, अतिवृष्टीदरम्यान लिंबाचे झाड कोसळल्याने गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुःखद घटनेची माहिती मिळताच माजी आमदार मा. स्नेहलताताई कोल्हे यांनी धामोरी येथे जाऊन संबंधित कुटुंबाची भेट घेतली. सौ. सुनीता प्रकाश कांबळे व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांनी कुटुंबाला धीर दिला व परिस्थितीची पाहणी केली.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बचत गट सखी सौ. सुनीता प्रकाश कांबळे यांना तातडीने नवीन गाय भेट देण्यात आली. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक घडी पुन्हा सुरळीत व्हावी, या उद्देशाने हा मदतीचा हात पुढे करण्यात आला. तसेच संबंधित कुटुंबाला शासनस्तरावर तात्काळ मदत मिळावी, यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलासराव माळी, माजी संचालक अशोकराव भाकरे, कैलासराव माळी, टीडीपीचे व्हाईस चेअरमन बाजीराव विनोद मांजरे, कोपरगाव तालुका भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजयराव साळुंखे, प्रकाशराव वाघ, काकासाहेब वाघ, राहुल वाणी, सुनील वाणी, बाजीराव मांजरे, भाऊसाहेब भाकरे, वसंत गणपत माळी, राजेंद्र पगार, दौलत माळी, प्रदीप भुसे, नंदलाल माळी, दीपक माळी, गणेश माळी, नाझीम शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




