
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने दहा दिवसीय वाहन क्षेञातील बदलते तंञज्ञान याविषयी विशेष प्रशिक्षण संपन्न झाले. महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या मार्फत लोकभारती एज्युकेशन सोसायटी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयटीआय मधील १८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला अशी माहिती प्राचार्य अर्जुन आहेर यांनी दिली.
प्रवरेचा विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न असावा पुस्तकी ज्ञानाबरोबरच त्याला व्यावहारिक ज्ञान मिळावे प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रांमध्ये होत असलेले बदल या विद्यार्थ्यांना माहिती व्हावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून वेळोवेळी विविध विषयाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत असते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ऑटोमोबाईल क्षेत्रात होत असलेले बदल विद्यार्थ्यांना माहिती व्हावेत हा उद्देश ठेवून बेसिक इंजिन, ई व्हेईकल, सीएनजी इंजिन तसेच इंजिनाच्या विविध सिस्टीमचे ट्रेनिंग त्याचबरोबर स्मार्ट क्लासरूम आणि प्रत्यक्ष कृती द्वारे दहा दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात आणि विशेषता वाहन क्षेत्रात होत असलेले बदल आणि त्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याबरोबरच कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधी मुलाखात तंत्र, संवाद कौशल्य, औद्योगिक सुरक्षा आदी विषयाची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षिका कविता दंडोरे यांनी दिली.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्राचार्य अर्जुन आहेर, संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे प्रमुख प्रा. मनोज परजणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवीन माहिती मिळाली त्याचबरोबर या माध्यमातून नवा आत्मविश्वास आम्हाला मिळाला अशा प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थींनी यावेळी व्यक्त केल्या.
