अहिल्यानगर जिल्हा

राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही; प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहुरी– नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वाहतूक कोंडीची कारणे जाणून घेत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. येत्या दोन दिवसांत प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांची बैठक घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

नगर-मनमाड महामार्गावर गेल्या तीन दिवसांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, वाहनचालकांसह प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे तसेच चिंचोली फाटा ते कोल्हारदरम्यान वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली असून, वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा वेळ वाया जात आहे.या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहुरी फॅक्टरी येथे थांबून परिस्थितीची पाहणी केली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

 

तसेच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याशी चर्चा करून वाहतूक व्यवस्थापनाबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.दरम्यान, सकाळपासूनच डॉ. सुजय विखे पाटील यांचे सहकारी आणि पोलीस प्रशासन वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्नशील होते. वाहनांची ये-जा सुरळीत व्हावी आणि प्रवाशांना दिलासा मिळावा, यासाठी वाहतूक नियंत्रित करण्याचे प्रयत्न करण्यात आले.

मात्र, वारंवार निर्माण होणाऱ्या या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे. यासाठी येत्या दोन दिवसांत प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांची बैठक घेऊन उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या वाहनचालक आणि प्रवाशांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!