अहिल्यानगर जिल्हा

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणातून देशसेवेची संधी; प्रवरेचे योगदान अभिमानास्पद – डॉ. महेश खर्डे

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूलचा २९ वा वर्धापन दिन उत्साहात

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – पारंपरिक शिक्षणाबरोबरच सैनिकी शिक्षणाच्या माध्यमातून प्रवरेने शिक्षण क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज सैनिक स्कूलमधून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी देशसेवेत कार्यरत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. पद्मविभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले हे सैनिक स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणातून देशसेवेची प्रेरणा देणारे महत्त्वपूर्ण केंद्र ठरले आहे, असे प्रतिपादन लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूलचे कॅम्पस संचालक डॉ. महेश खर्डे यांनी केले. 

 

सैनिक स्कूलच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कर्नल सुभाष घोडगिरे, प्राचार्य राजेश माघाडे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. महेश खर्डे म्हणाले की, प्रवरेने ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात अग्रस्थान मिळविले आहे. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरेतील विविध उपक्रम विद्यार्थी-केंद्रित ठरत आहेत.

 

सैनिक स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विविध क्रीडा प्रकारांत प्रावीण्य मिळविण्याची आणि देशसेवेसाठी स्वतःला घडविण्याची संधी मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्यात शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी विद्यालयाचे प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत. प्रवरेच्या शैक्षणिक कार्यामुळे संस्थेचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले असून, सैनिक स्कूलचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धा आणि कलाप्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे व्यवस्थापन सहशिक्षक केतन तेलोरे यांनी केले, तर सहशिक्षक ज्ञानेश्वर पाठक यांनी आभार मानले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!