(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
पुणतांबा – राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा गावात मटका, जुगार, बेकायदा वाळू उपसा आणि मुरूम-मातीचा उपसा यांसारखे अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप होत आहे. या अवैध धंद्यांविरोधात सातत्याने बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गावातील अवैध धंद्यांविरोधात बातम्या प्रसिद्ध करूनही परिस्थितीत बदल होत नसल्याची खंत संबंधित पत्रकाराने व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, पुन्हा बातमी प्रसिद्ध केल्यास पत्रकाराचा कुठे आणि कसा ‘गेम’ केला जाईल, हे समजणार नाही, असा धमकीवजा इशारा काही अवैध व्यवसायांशी संबंधित व्यक्तींकडून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
श्रीक्षेत्र पुणतांबा येथे सुरू असल्याचे सांगितले जाणारे मटका, जुगार, बेकायदा वाळू उपसा आणि मुरूम-माती उपशाचे प्रकार पुन्हा चर्चेत आले आहेत. एका माध्यमस्थामार्फत या अवैध धंद्यांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही याबाबतची माहिती संबंधित पत्रकाराला दिल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गावात अवैध धंदे करणाऱ्यांच्या स्वतंत्र टोळ्या तयार झाल्या असून, वर्चस्वाच्या कारणावरून त्यांच्यात संघर्ष होत असल्याची चर्चा आहे. पत्रकारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न होत असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकारांमुळे अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
कामगार तलाठी आणि ग्रामसेवक यांसारखे जबाबदार अधिकारी बाहेरगावाहून ये-जा करत असल्याने स्थानिक पातळीवरील प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकाराला धमकी मिळाल्याचे वृत्त यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित विभागांनी या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
या घटनेची माहिती संबंधित पत्रकार लवकरच पोलीस निरीक्षक आणि जिल्हा पोलीसप्रमुखांना प्रत्यक्ष भेटून देणार असल्याचे समजते. पुणतांबा हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले गाव असल्याने येथील अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी आणि महसूल विभागाने संयुक्तपणे कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
अवैध धंद्यांविरोधात बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकाराला धमकी मिळणे ही गंभीर बाब आहे. पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, यासाठी प्रशासनाने त्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. संबंधित धमकी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच पुणतांबा परिसरातील कथित अवैध धंद्यांची चौकशी करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.