(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर : शहरातील वाढत्या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर यश आले. आ. हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे आणि प्रकाश चित्ते यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आ. विवेक भैय्या कोल्हे यांनी पाठिंबा दर्शवत उपोषण सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या शिष्टाईनंतर पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केल्याचे अधिकृत लेखी पत्र दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी चौकात प्रकाश चित्ते आणि आकाश दुबय्या हत्याकांडातील मृताचे बंधू कुणाल दुबय्या यांनी श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर उपोषण सुरू केले होते. शहरातील वाढती गुन्हेगारी, टोळ्यांचा वाढता प्रभाव आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती याविरोधात हे आंदोलन करण्यात आले. या उपोषणाला आ. हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सक्रिय पाठिंबा दिला.
दरम्यान, श्रीरामपूरकरांनी सलग चार दिवस कडकडीत बंद पाळला. त्यानंतर शहरातून विराट मोर्चाही काढण्यात आला. या आंदोलनामुळे पोलिस यंत्रणेवर मोठा दबाव निर्माण झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. नागरिकांच्या तीव्र भावनांची दखल घेत पोलिस प्रशासनाने संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाईची भूमिका घेतली.
पोलिस अधिकाऱ्यांकडून मकोका कारवाईचे लेखी पत्र
शनिवारी रात्री उशिरा पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर आणि पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांनी गोरख जेधे, सोन्या बेग, अंकुश जेधे व मनोज साबळे या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केल्याचे अधिकृत पत्र दिले. या लेखी पत्रानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आ. विवेक भैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत आणि पाठबळाने उपोषण सोडविण्यासाठी करण्यात आलेल्या विशेष प्रयत्नांना यश आले.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, श्रीरामपूरकरांनी एकजुटीने उभे राहून केलेला बंद आणि विराट मोर्चा यामुळे पोलिस प्रशासनावर कारवाई करण्यासाठी दबाव निर्माण झाला. नवीन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर गुंड टोळ्यांविरोधात कडक कारवाईला सुरुवात झाली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सोन्या बेग प्रकरणातील बेपत्ता अल्पवयीन मुलीला पोलिसांनी सिन्नर येथून ताब्यात घेतले असून, वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याच्या गुन्ह्याला पुष्टी मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनाला शरद पवार, सुप्रिया सुळे, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, गोदाधाम सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज, महंत भास्करगिरी महाराज तसेच आ. विवेक भैय्या कोल्हे यांच्यासह विविध मान्यवरांनी पाठिंबा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात ठोस कारवाईचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, माजी शिवसेना आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा दिला जाणार नसल्याची भूमिका व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पक्षप्रमुख तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनकर्त्यांनी संघटित गुन्हेगारीविरोधातील लढा केवळ मकोका कारवाईपुरता मर्यादित न ठेवता शहरातून गुन्हेगारीचे पूर्ण उच्चाटन होईपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. पोलिसांकडून लेखी कारवाई मिळाल्यानंतर उपोषणाची सांगता झाली असली, तरी श्रीरामपूर शहराच्या सुरक्षिततेसाठी पुढील काळातही हा लढा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.