
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी त्यांच्या ‘नॉन रिफंडेबल रिझर्व्ह फंड’ ठेवींवर जिल्हा सहकारी बँकेच्या आजी-माजी सेवकांप्रमाणे व्याजदर देण्यात यावा, या मागणीसाठी ठराव करून तो जिल्हा सहकारी बँकेच्या प्रशासक संगीता डोंगरे यांच्याकडे पाठवावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केले आहे.
जिल्हा सहकारी बँकेची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रशासक संगीता डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत शेतकरी आणि सहकारी संस्थांच्या हिताचे विविध ठराव मांडण्यात आले. त्यामध्ये सहकारी संस्थांच्या ‘नॉन रिफंडेबल रिझर्व्ह फंड’ ठेवींना जिल्हा बँकेच्या आजी-माजी सेवकांना देण्यात येणाऱ्या व्याजदराप्रमाणे व्याज देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना जिल्हा सहकारी बँकेमार्फत कर्जाच्या व्याजात सवलत देण्यात यावी, अशा अन्य मागण्यांचेही ठराव मांडण्यात आले आहेत. या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांच्या चेअरमन व संचालक मंडळाने आपल्या संस्थेचा ठराव करून तो जिल्हा बँकेकडे तातडीने पाठवावा, असे शेळके यांनी म्हटले आहे.
‘नॉन रिफंडेबल रिझर्व्ह फंड’वरील व्याजदरात वाढ झाल्यास जिल्ह्यातील सहकारी संस्थांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. या वाढीव व्याजदरामुळे जिल्ह्यातील संस्थांना वर्षाला सुमारे १९ कोटी ६० लाख रुपये अतिरिक्त व्याज मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत सहकारी संस्थांना आर्थिक आधार मिळण्यास मदत होईल, असे शेळके यांनी सांगितले.
या मागणीसाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व सहकारी संस्थांनी एकत्रितपणे सहकार्य करावे. संस्थांच्या हितासाठी जिल्ह्यातील सर्व चेअरमन व संचालक मंडळांनी ठराव करून तो जिल्हा सहकारी बँकेच्या प्रशासक संगीता डोंगरे यांच्याकडे पाठवावा, असे आवाहन विठ्ठलराव शेळके यांनी केले आहे.




