
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील जळगाव पंचक्रोशी येथे सालाबादप्रमाणे महाशिवरात्रि निमित्त श्री महादेव मंदिर जळगाव येथे रविवार, १५ फेब्रुवारी रोजी श्री महाशिवरात्री महोत्सवाचे मोठ्या भक्तीभावात आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती श्री महादेव मंदिर भक्त मंडळाच्या वतीने देण्यात आली असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
श्री महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त पहाटे ४ वाजता श्री महादेवांना गंगेच्या पवित्र जलाने महास्नान घालण्यात येणार आहे. सकाळी ७ ते ९ या वेळेत महाराष्ट्र पोलीस दल, जळगाव यांच्या वतीने लघुरुद्र अभिषेक व महाआरती होणार आहे. तसेच सकाळी ८ वाजता शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करण्यात येईल.
सकाळी १० वाजता ज्ञानई वारकरी वेदांत शिक्षण संस्था, गोंधवणी येथील गुरुवर्य ह.भ.प. ऋषिकेशजी महाराज वाकचौरे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता महाराष्ट्र पोलीस दल, जळगाव यांच्या वतीने भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात येणार आहे.या धार्मिक सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महादेव मंदिर भक्त मंडळाच्या वतीने सर्व भाविकांना करण्यात आले आहे.




