कोपरगाव तालुकाप्रशासकीयमहाराष्ट्र

कोपरगाव शहरातील निवासी अतिक्रमणे नियमित होणार; नागरिकांना मिळणार हक्काचे सातबारा उतारे – नगराध्यक्ष पराग संधान

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – नगरपरिषद हद्दीतील निवासी अतिक्रमणे नियमित होवून नागरिकांना हक्काचे सातबारा उतारे मिळणार असून संबंधित भागातील रहिवासी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज 31 डिसेंबर 2026 पर्यंत नगरपरिषदेकडे सादर करावीत,असे आवाहन नगराध्यक्ष पराग संधान यांनी केले आहे.

 

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील हनुमान नगर ,इंदिरानगर दत्तनगर महादेव नगर ,गजानन नगर गांधीनगर टिळक नगर ,संजय नगर सुभाष नगर लक्ष्मी नगर साईनगर येवला रोड, खडकी जिजामाता उद्यान व दत्त पार टाकळी नाक्या मागील बेट भागांतील निवासी अतिक्रमणे शासनाच्या नियमानुसार नियमित करण्यात येणार आहेत.कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शहरातील विविध भागांतील अतिक्रमित जागा नियमाकुल करून संबंधित लाभार्थ्यांच्या नावावर सातबारा देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. या अनुषंगाने शिर्डीचे प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि.२० मे रोजी प्रथम बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये नगराध्यक्ष पराग संधान यांनी शहरातील अतिक्रमित भागातील नागरिकांच्या समस्या मांडल्या होत्या.महसूल विभागाने यासंदर्भातील सुधारीत अध्यादेश नुकताच काढला असून, १ जानेवारी २०११ पूर्वीची तसेच निवासी अतिक्रमणे असलेल्या नागरिकांना राज्य शासन व महसूल विभागाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

 

शासनाच्या नवीन धोरणात्मक जीआरनुसार आता सुमारे पाच हजार प्रॉपर्टी पात्र ठरण्याची शक्यता असून, त्यामुळे लाभार्थ्यांना सातबारा वाटप प्रक्रियेत मोठा दिलासा मिळणार आहे.शहरातील अतिक्रमित भागातील नागरिकांसाठी दिनांक ६ जुन २०२६ पासुन छापील अर्ज संबंधित विभागाकडे उपलब्ध होणार असून यासाठी मालमत्ता कर नोंदवही, अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवही, १ जानेवारी २०११ दरम्यानचे वीज बिल, उपलब्ध असल्यास उपग्रह छायाचित्र तसेच गावठाण क्षेत्रातील भू-मालकी नसलेल्या लाभार्थ्यांसाठी मागील तीन वर्षांच्या मालमत्ता कर पावत्या आदी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित अर्जासह संबंधित विभागास संपर्क साधून दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन नगरध्यक्ष पराग संधान यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगरसह अनेक भागांमध्ये अनेक वर्षांपासून अतिक्रमणधारकांना स्वतःच्या हक्काचे उतारे मिळत नव्हते.या विषयासंदर्भात मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी सन २०१९ मध्ये विशेष पाठपुरावा करून सदरचा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संचालक नगररचना, पुणे यांच्याकडे पाठविला होता. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता या पाठपुराव्यास यश आले आहे.- नगराध्यक्ष पराग संधान

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!