
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध तंबाखू व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून पाथर्डी शहरात सुगंधीत तंबाखू व मावा तयार करणाऱ्या ठिकाणी छापा टाकून एकूण १,३३,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून दोघे फरार आहेत. पोलिसांनी या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
११ जुलै २०२५ रोजी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी विशेष पथकासह पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान मोहटा देवी रस्त्यालगत अक्षय पान टपरीवर छापा टाकला. यावेळी अभिजीत मिनीनाथ लांडे (वय ५२, रा. आनंदनगर, पाथर्डी) हा महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला ८ किलो सुगंधीत मावा विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ५,६०० रुपये किंमतीचा मावा जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने हा माल अक्षय गणेश इधाटे, राहूल अर्जुन सानप व सुनिल बाबासाहेब सानप यांच्याकडून घेतल्याचे सांगितले.
तत्पश्चात पोलिसांनी इंदोरानगर पाथर्डी येथील अक्षय इधाटेच्या घराजवळील शेडमध्ये छापा टाकून वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरलेली ६५ किलो (किंमत ६०,८०० रुपये) सुगंधीत तंबाखू जप्त केली. मात्र, अक्षय इधाटे हा घटनास्थळी सापडला नाही. पुढे तपास करताना पोलिसांना तनपुरवाडी फाटा येथे मावा तयार करण्याचे मशिन असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी छापा टाकल्यानंतर एक इसम मावा तयार करताना दिसून आला. त्याची ओळख सुनिल बाबासाहेब सानप (वय ३६, रा. शिरसाटवाडी) अशी झाली.
शेडमध्ये १० किलो तयार मावा (किंमत ७,००० रुपये), ६ किलो सुगंधीत तंबाखू (४,८०० रुपये) आणि ५५,००० रुपये किंमतीचे मावा तयार करण्याचे मशिन असा एकूण ६६,८०० रुपयांचा मुद्देमाल सापडला. सुनिल सानप याने हा व्यवसाय राहूल अर्जुन सानप (रा. शिरसाटवाडी, सध्या फरार) याच्या मदतीने चालविल्याचे कबूल केले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून अभिजीत लांडे व सुनिल सानप या दोघांना अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान कलम १२३, २२३, २७४, २७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत एकूण १,३३,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात ५५,००० रुपयांचे मशिन, १८ किलो मावा (१२,६०० रुपये) व ७१ किलो सुगंधीत तंबाखू (६५,६०० रुपये) यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी (शेवगाव) सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक विशेष पथकाचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकामध्ये पोसई राजेंद्र वाघ, पोहेकॉ शंकर चौधरी, पोहेकॉ अजय साठे, पोहेकॉ दिगंबर कारखेले, पोहेकॉ मल्लिकार्जुन बनकर, पोहेकॉ अरविंद भिंगारदिवे, पोहेकॉ उमेश खेडकर, पोहेकॉ सुनिल पवार, पोकॉ सुनिल दिघे, पोकॉ अमोल कांबळे, पोकॉ संभाजी बोराडे, पोकॉ विजय ढाकणे, पोकॉ दीपक जाधव व पोकॉ जालिंदर दहिफळे यांनी सहभाग घेतला.




