प्रशासकीयमहाराष्ट्र

जळगाव ग्रामपंचायतीत आश्वासनांची खैरात; सीसीटीव्ही यंत्रणा कागदावरच, प्रशासकांनी ग्रामस्थांना बनवले “एप्रिल फुल”

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायत परिसरात सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे अद्यापही बसविण्यात आलेले नाहीत. कॅमेरे बसविण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस हालचाल झालेली दिसून येत नाही. विशेष म्हणजे, सुमारे नऊ महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीने गावात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि त्यासाठी मासिक सभेत अधिकृत ठरावही मंजूर करण्यात आला होता.या योजनेसाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत निधी उपलब्ध झाल्याचेही सांगण्यात आले होते. ८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ग्रामपंचायतीत लोकनियुक्त प्रतिनिधी कार्यरत होते व त्यांना आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकारही होते. तरीदेखील संबंधित पदाधिकाऱ्यांकडून या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र समोर येत आहे.प्रत्यक्षात एप्रिल महिन्यापर्यंतही गावात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेली नसून, संपूर्ण योजना कागदावरच असल्याचा आरोप होत आहे. वारंवार आश्वासने देऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने केवळ आश्वासनांची खैरात वाटतं नागरिकांना “एप्रिल फुल” बनविल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 

या प्रश्नावर दैनिक नवराष्ट्रने दि. १२ मार्च रोजी “कॅमेरे बसविण्याच्या कामाला जळगावमध्ये मुहूर्त मिळेना” अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.यावर प्रशासक असणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी भाष्य करणे टाळले आहे.विशेष म्हणजे, सीसीटीव्ही बसविण्याचे काम २०२५-२६ च्या वार्षिक आराखड्यात समाविष्ट करण्यात आले होते. तसेच आराखडा सादर करताना ग्रामपंचायतीची मुदत संपण्यास सुमारे सात महिन्यांचा कालावधी शिल्लक होता. २१ जून २०२५ रोजी झालेल्या मासिक सभेत विषय क्रमांक ८ अंतर्गत हा मुद्दा अबंधित कामांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला होता. त्या वेळी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत गावाससह शाळा व अंगणवाडी परिसरात कॅमेरे बसविण्यासाठी सुमारे चार लाख रुपयांचा निधी अबंधित केल्याची नोंद करण्यात येवून संबंधित कामासाठी वापर करण्यास प्राथमिक मान्यताही देण्यात आली होती.गावाअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षितता सुनिश्चित करणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे.अशा मूलभूत सुविधांसाठी शासनाकडून ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जातो.टेंडर प्रक्रिया राबविली जाते.निधी प्राप्त झाल्यानंतर तो ठराविक कामांसाठी वेळेत खर्च करून सुविधा उपलब्ध करून देणे प्रशासनासाठी अनिवार्य असते. मात्र या सर्व बाबींना फाटा देत जळगाव ग्रामपंचायत निष्क्रिय असल्याचे चित्र दिसत आहे. 

 

या दरम्यान, जळगाव ग्रामपंचायत येथे प्रशासक म्हणून नियुक्त असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सचिव यांनी फेब्रुवारी २०२६ पासून प्रशासकराज लागू झाल्याने आर्थिक व्यवहारांवर मर्यादा आल्याचे सांगितले होते.तथापि एप्रिल २०२६ महिना अखेर पर्यंत सर्व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येईल,अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती.तसेच या कामासाठी अहिल्यानगर येथील एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला होता.मात्र प्रत्यक्षात एप्रिल महिना उलटून गेला तरी कुठलीही सीसीटीव्ही कॅमेरे गावात बसलेले नाही.तसेच ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही मॉनिटरिंग कारण्यासाठी आवश्यक असलेली संगणक व्यवस्था देखील उभारण्यात आलेली नाही.मात्र एप्रिल महिना उलटून गेला तरीही गावात प्रत्यक्षात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या हालचाली नाहीत.त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून गावातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून.’आंधळ्याच्या गावात काणा राजा’ अशी म्हण येथे लागू होते. ग्रामपंचायतीने याबाबत तातडीने निर्णय घेऊन कामाला सुरुवात करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!