अहिल्यानगर जिल्हा

वैद्यकीय शिक्षणात तंत्रज्ञानासोबत सेवाभाव आणि मानवी मूल्ये जपा-डॉ. दत्तात्रेयुडू नोरी

पद्मभूषण डॉ. दत्तात्रेयुडू नोरी यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश; विखे पाटील विद्यापीठाच्या पहिल्या बॅचचा स्वागत समारंभ उत्साहात

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

अहिल्यानगर – कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठे परिवर्तन घडत असताना डॉक्टरांनी मानवी मूल्ये, सहानुभूती आणि सेवाभावाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कर्करोगतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. दत्तात्रेयुडू नोरी यांनी केले. वैद्यकशास्त्राचे भविष्य केवळ प्रयोगशाळांमध्ये घडत नाही, तर व्यक्तींच्या विचारांत आणि कृतीत घडते. वैद्यकीय सेवेच्या केंद्रस्थानी आध्यात्मिक सेवाभाव असतो, हे कधीही विसरू नका, असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

 

पद्मश्री डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या २३ व्या बॅचमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसह नव्याने स्थापन झालेल्या लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठाच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते.या वेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, वसंतराव कापरे, नंदकुमार झावरे, सुभाष पाटील, उत्तमराव कदम, सुभाषराव भदगले, विनायकराव देशमुख, डॉ. अभिजित दिवटे आणि डॉ. पांडुरंग गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

 

वैद्यकीय शिक्षणातील बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना डॉ. नोरी म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर बुद्धिमत्ता, नैतिक मूल्ये, सहानुभूती आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. संगणकीय तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि मानवाप्रती असलेली करुणा यांचा समन्वय साधणे ही आधुनिक वैद्यकीय सेवेची गरज बनली आहे. कर्करोगावरील उपचारांमधील बदलांचा अनुभव सांगताना त्यांनी निदान, शस्त्रक्रिया आणि किरणोत्सर्गावर आधारित पारंपरिक उपचारपद्धतींपासून आधुनिक कर्करोगशास्त्राने मोठी प्रगती केल्याचे नमूद केले. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जनुकीय माहितीच्या विश्लेषणाच्या मदतीने रुग्णाची जैविक वैशिष्ट्ये, जीवनशैली आणि सामाजिक-आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन अधिक अचूक व वैयक्तिक स्वरूपाचे उपचार सुचविणे शक्य होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

वैद्यकीय शास्त्रात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी रुग्णाची जीवनकहाणी विसरू नका, असे सांगत डॉ. नोरी यांनी विद्यार्थ्यांना मानवी दृष्टिकोन जपण्याचे आवाहन केले. प्रत्येक वैद्यकीय अहवालामागे एक मानवी जीवन आणि त्याच्या कुटुंबाचे भविष्य दडलेले असते. त्यामुळे भविष्यातील डॉक्टरांनी जीवशास्त्र, माहिती तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी विज्ञानासोबतच मानवी मूल्यांचीही जाण विकसित करणे आवश्यक आहे. उत्कृष्ट वैद्यकीय सेवा केवळ मोठ्या आणि नामांकित रुग्णालयांमध्येच दिली जाते असे नाही, तर जिथे वैद्यकीय सेवेची खरी गरज आहे, तिथेही डॉक्टरांनी तत्परतेने सेवा द्यावी. प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा सेवा करणारे हात अधिक पवित्र असतात. प्रत्येक रुग्णाची भेट म्हणजे मानवी रूपातील परमेश्वराची सेवा करण्याची संधी आहे, या शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना सेवाभावी वृत्तीने कार्य करण्याचा संदेश दिला.

 

जलसंपदामंत्री तथा डॉ. विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा समारंभ ऐतिहासिक असल्याचे नमूद केले. राज्यातील पहिल्या खासगी ग्रामीण विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचा हा क्षण संस्थेसाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. विखे पाटील म्हणाले की, विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाने २३ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. विद्यापीठ स्थापनेचे स्वप्न साकार झाल्याचा मोठा आनंद आहे. या महाविद्यालयात प्रवेश घेतलेले विद्यार्थी आता फाउंडेशनच्या परिवाराचा भाग झाले असून, कुटुंबाप्रमाणे त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

 

पद्मभूषण डॉ. दत्तात्रेयुडू नोरी यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कर्करोगतज्ज्ञ या समारंभाला उपस्थित असल्याबद्दल समाधान व्यक्त करताना डॉ. विखे पाटील यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. शिर्डीचा आध्यात्मिक संदेश न्यूयॉर्कपर्यंत पोहोचवत त्यांनी तेथे साईमंदिर उभारले. त्यांच्या मार्गदर्शनातून विखे पाटील फाउंडेशन आणि नव्याने स्थापन झालेले विद्यापीठ देशात अग्रस्थानी पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

डॉ. नोरी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना भारताशी असलेले आपले नाते अधोरेखित केले. विविध संस्थांशी जोडलेले असतानाही आपले मन भारताशी घट्ट जोडलेले आहे. विखे पाटील फाउंडेशनच्या कर्करोग रुग्णालयातून जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहोत, असे त्यांनी सांगितले.शिर्डीच्या साईबाबांवरील श्रद्धा हा आपला नैतिक दिशादर्शक आणि शक्तीचा स्रोत असल्याचे नमूद करत त्यांनी निःस्वार्थ सेवा, नम्रता आणि सर्व जीवांप्रती प्रेम हीच आपल्या कार्याची प्रेरणा असल्याचे स्पष्ट केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!