अहिल्यानगर जिल्हाबिबट्याचा हल्लाराहाता तालुका

चितळी परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ; हल्ल्यात तीन वर्षांची कालवड ठार

पशुधनावरील हल्ल्यांमुळे शेतकरी आर्थिक संकटात; बिबट्यांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा - सरपंच नारायणराव कदम

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यातील चितळी रेल्वे स्टेशनलगत असलेल्या शेतकरी भारत दगडू ताके यांच्या वस्तीवर रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून तीन वर्षे वयाच्या कालवडीला ठार मारले. या घटनेत सुमारे ३० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकरी भारत ताके यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती शेतकरी भारत ताके यांनी सोमवारी सकाळीच चितळीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम यांना दिली. सरपंच कदम यांनी कोपरगाव वन विभागाच्या वनरक्षक सविता थोरात यांना दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती कळविली. त्यानंतर वनरक्षक सविता थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत कालवडीचा पंचनामा केला.

चितळी परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्यांकडून शेळ्या, पाळीव कुत्रे, गाई आणि कालवडींवर सातत्याने हल्ले होत आहेत. अनेकदा माणसांवरही बिबट्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शेतकरी आणि पशुपालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सध्या विविध भागांत ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. ऊसतोडीमुळे बिबट्यांना लपण्यासाठी आणि निवारा मिळण्यासाठी उपयुक्त असलेली उसाची शेती मोकळी होत आहे. त्यामुळे बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास उघडा पडून ते सुरक्षित आसऱ्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडे वळत असल्याची शक्यता आहे. परिणामी, शेतवस्त्यांवरील पशुधनावर हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यातच पशुधन सांभाळण्यासाठी चाऱ्याची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी मोठ्या कष्टाने आपल्या पशुधनाचे संगोपन करत असताना बिबट्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अशा घटनांचा मोठा फटका बसत आहे.

“चितळी परिसरात बिबट्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. पशुधन सांभाळण्यासाठी चाऱ्याची कमतरता असतानाही शेतकरी जनावरांचे संगोपन करत आहेत. मात्र, बिबट्यांकडून वारंवार पशुधनावर हल्ले होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे कोपरगाव वन विभागाने या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.”— नारायणराव कदम, प्रथम लोकनियुक्त सरपंच, चितळी

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!