प्रशासकीयमहाराष्ट्र

चितळी-गोंडेगाव रस्त्याच्या डांबरीकरण त्रुटींवर सुरू असलेले उपोषण तिसऱ्या दिवशी मागे;अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना लेखी आश्वासन

अहिल्यानगर खबरबातवर बातमी प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी झाले खडबडून जागे 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपूर – चितळी ते गोंडेगाव या रस्त्याच्या डांबरीकरण व साईड पट्टीतील त्रुटींविरोधात 20 एप्रिलपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर तीन दिवसांनंतर मागे घेण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते अमोल तांबे यांनी सुरू केलेल्या या उपोषणाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येत रस्त्याचे काम इस्टिमेट अंदाजपत्रकानुसार करण्याचे लेखी आश्वासन दिले.ग्रामस्थांच्या सहमतीने व अधिकाऱ्यांच्या विचार विनिमयाने सदरील उपोषण सोडण्यात आले.

माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून 2022-23 च्या आर्थिक तरतुदीतून चितळी–गोंडेगाव (ईजिमा 167) जुना मातुलठाण-नायगाव रस्त्याच्या सुधारणेचे काम हाती घेण्यात आले होते. जवळपास 3 कोटी 58 लाख रुपयांचे हे काम असून,सुरुवातीपासूनच रस्त्याच्या डांबरीकरण व साईड पट्टीतील त्रुटींबाबत ग्रामस्थांकडून तक्रारी होत होत्या.दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी काम पूर्णत्वास येण्याच्या टप्प्यावर असताना ठेकेदाराकडून कामात दिरंगाई होऊ लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर डांबरीकरण व साईड पट्टीतील त्रुटींबाबत ठेकेदाराला सांगूनही सुधारणा न झाल्याने ग्रामस्थांनी काम बंद पाडले. सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित लोकप्रतिनिधींना तक्रार करूनही प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत उपोषणाचा निर्णय घेतला. त्यानुसार 20 एप्रिलपासून गोंडेगाव येथील मारुती मंदिरात अमोल तांबे यांनी आमरण उपोषण सुरू केले. 

चितळी व गोंडेगाव ग्रामस्थांसह वारंवार श्रीरामपूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करून ठेकेदारास इस्टिमेटनुसार काम करण्याच्या सूचना देण्याची मागणी केली होती. तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती.उपोषणाच्या पहिल्या तीन दिवसांत कोणताही अधिकारी स्थळी न आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. तब्बल तीन दिवस अन्नपाणी न घेतल्याने उपोषणकर्ते तांबे यांची तब्येत खालावू लागली होती.यावेळी बुधवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थापत्य सहाय्यक प्रतीक्षा वारुळे,दानिश शेख यांनी उपोषण स्थळी भेट देवून तक्रार समजुन घेतली.गोंडेगाव ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी सामंजस्याने चर्चा करून उपोषण मागे घेण्याआधी लेखी देण्याची विनंती केली.

 

अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकत डांबरीकरण व साईड पट्टीचे काम इस्टिमेटनुसार करण्याबाबत लेखी पत्र दिले. त्यानंतर अमोल तांबे यांची समजूत काढत संबंधित कामे निकषांनुसार पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.यावेळी शंतणू फोपसे, विजय हरगुडे,राजेंद्र थोरात,गणपत तांबे, सलीम सय्यद, सुनिल जगताप, विजय तांबे,सोमनाथ आमले, मच्छिंद्र रंगनाथ, फोपसे,संदीप पोखरे, आण्णासाहेब फोपसे, उद्धव कोळसे,बाळासाहेब दिवटे,संतोष तांबे, बाबासाहेब तांबे,राजेंद्र तांबे, गोरख थोरात,दत्तात्रय थोरात यांच्यासह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!