
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
नाशिक – आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की, जर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली, तर ते महाविकास आघाडीचे सर्वसंमतीचे उमेदवार असतील. नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना थोरात यांनी आघाडीतील समन्वयावर भर दिला.

थोरात यांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे इच्छुक नसतील तर काँग्रेस या जागेसाठी स्वतःचा उमेदवार उभा करेल आणि याबाबत शिवसेना (उबाठा) पक्षाशी चर्चा केली जाईल. त्यांनी पुढे सांगितले की, या जागेसाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक असून पक्ष तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या विचारात आहे. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील, शरद आहेर, जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, भरत टाकेकर, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर गायकवाड, शहराध्यक्ष आकाश छाजेड, युवक जिल्हाध्यक्ष गौरव पाटील पानगव्हाणे, डॉ. दिनेश बच्छाव, गुणवंत होळकर, उल्हास सातभाई आदी उपस्थित होते.
दरम्यान, विधानपरिषदेत संधी न मिळाल्यास राज्यसभेचा पर्याय खुला ठेवणार का, या प्रश्नावर थोरात म्हणाले, “मी राजकारणी आहे आणि राजकारणात प्रत्येकालाच महत्त्वाकांक्षा असते,” असे सांगत त्यांनी भविष्यातील संधींबाबत संकेत दिले. यामुळे त्यांनी पुढील राजकीय पर्याय खुले ठेवले असल्याचे स्पष्ट झाले.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत शोक व्यक्त करताना त्यांनी या घटनेबाबत संशय व्यक्त केला. “हा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे, मात्र या अपघाताबाबत शंका निर्माण होते. या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, ही महाराष्ट्राची भावना आहे,” अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही टीका करत विरोधी पक्षातील काही नेते चौकशा टाळण्यासाठी आणि सहकारी संस्थांच्या फायद्यासाठी सत्ताधारी पक्षात जात असल्याचा आरोप केला, तसेच भाजपमध्ये गेलेले माजी आमदार संग्राम थोपटे यांचे उदाहरण देत अनेकांचा भ्रमनिरास झाल्याचेही त्यांनी नमूद केले.




