प्रशासकीयमहाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे आयोजन अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्यात विशेष उपक्रम मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर-जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवड्या’च्या निमित्ताने, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे आयोजन केले आहे. २५ ते २९ एप्रिल २०२६ दरम्यान ही यात्रेचे आयोजन असून, जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनाचा संदेश देण्यासाठी श्रीक्षेत्र चौंडी आणि श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून सुरू होणार्या यात्रेचा समारोप श्रीक्षेत्र महेश्वर (मध्य प्रदेश) येथे होणार असल्याची माहीती माहिती जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

 

मंत्री विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून यात्रेच्या संपूर्ण नियोजन सविस्तरपणे सांगितले. यात्रेचा शुभारंभ श्रीक्षेत्र चौंडी आणि त्र्यंबकेश्वर येथून एकाच दिवशी, २५ एप्रिल २०२६ रोजी करण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. इंदूर संस्थानच्या होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत युवराज यशवंत होळकर बहाद्दूर यांना निमंत्रित करण्यात आले असून,या ठिकाणी १०८ कन्यांच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

 

“चौंडी येथील यात्रेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि आमदार राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, दोन्ही ठिकाणी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमास राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी आणि आध्यात्मिक क्षेत्रातील महंतांना निमंत्रित करण्यात आले आहे.

 

नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या जिल्ह्यांतून ही यात्रा मार्गस्थ होणार आहे. चौंडी आणि त्र्यंबकेश्वर येथून निघणाऱ्या दोन्ही यात्रा २६ एप्रिल २०२६ रोजी शिर्डी येथे एकत्रित येतील. या ठिकाणी राज्यातील ३० नदीखोऱ्यांतून विधिवत पूजन करून आणलेले जलकलश एकत्रित केले जातील. या कलशांचे पूजन करून हे सर्व कलश यात्रेसोबत महेश्वर (मध्य प्रदेश) येथे नेण्यात येणार आहेत.”

 

“विचार, वारसा आणि विकास या त्रिसूत्रीच्या आधारे राज्यातील जल व्यवस्थापन आणि जलसंवर्धनाचे काम अधिक प्रभावीपणे कसे करता येईल व या कार्यात लोकसहभाग कसा वाढेल, या उद्देशाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाबरोबरच पाणी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती, सेवाभावी संस्था, शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिक यांच्यासोबतच, यंदाचे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित झाल्याने महिलांचा सहभागही लक्षणीय असेल, असे विखे पाटील यांनी सांगितले.

 

यात्रेचा मुक्काम ज्या ठिकाणी असेल तिथे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि जल प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या यात्रेत ५०० जलयात्री व चित्ररथ सहभागी होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना या उपक्रमात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे. ३० नदीखोऱ्यांतील जलपूजनाचे कार्यक्रम त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यासाठी जलसंपदा विभागाने पुढाकार घेतल्याचेही मंत्री विखे पाटील म्हणाले.”

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!