
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश चितळी महाविद्यालयात दिव्यांग सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, समान संधी मिळावी आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने सप्ताहभर विविध उपक्रम राबविण्यात आले.
३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.चित्रकला, निबंध, दिव्यांग विद्यार्थ्यांची दौड, चमचा-लिंबू शर्यत, पालकांचे समुपदेशन तसेच प्रत्येक दिव्यांग विद्यार्थीच्या नावाने महाविद्यालयाच्या आवारात वृक्षलागवड अशा उपक्रमांचा समावेश होता.
स्पर्धांमध्ये विजयी विद्यार्थ्यांना बक्षिसे आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमांना राहाता पंचायत समितीचे विशेषतज्ञ शिक्षक गव्हाणे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा स्तरावर दिव्यांग विभाग प्रमुख दहिफळे यांनी समन्वयनाची जबाबदारी सांभाळली.दिव्यांग सप्ताहाच्या आयोजनात विद्यालयाचे प्राचार्य नामदेव शिरसाट आणि पर्यवेक्षिका सातव, ए. एस. यांचे सहकार्य लाभले.




