अहिल्यानगर जिल्हाआमदार विवेकभैय्या कोल्हेकोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील दहा गावांत नवीन आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी द्या;आ.विवेक कोल्हे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

आरोग्य विभागाच्या बृहत कृती आराखड्याचे काम सुरू;तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व तत्काळ प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी दहा गावांमध्ये नवीन आरोग्य उपकेंद्रे सुरू करण्याची मागणी आ. विवेक कोल्हे यांनी केली आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना पत्र देऊन आरोग्य विभागाच्या बृहत कृती आराखड्यात संबंधित गावांचा समावेश करून नवीन आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

 

 

आरोग्य विभागाच्या बृहत कृती आराखड्याचे काम सुरू असून, कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती, वाढती लोकसंख्या आणि नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधांसाठी करावा लागणारा प्रवास लक्षात घेता, काही गावांमध्ये नवीन आरोग्य उपकेंद्रे सुरू करणे गरजेचे असल्याचे आ. विवेक कोल्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, खिर्डी गणेश, टाकळी, माहेगाव देशमुख, कारवाडी मोतीनगर (सुरेगाव), नऊचारी (संवत्सर), माळवाडी (कोकमठाण), तिळवणी आणि जेऊर पाटोदा या दहा गावांमध्ये नवीन आरोग्य उपकेंद्रे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना वेळेत प्राथमिक आरोग्य सेवा मिळणे आवश्यक आहे. मात्र, आरोग्य सुविधांसाठी नागरिकांना अन्य ठिकाणी जावे लागत असल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. संबंधित दहा गावांमध्ये नवीन आरोग्य उपकेंद्रे सुरू झाल्यास स्थानिक नागरिकांना जवळच्या परिसरात प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे आ. विवेक कोल्हे यांनी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.

त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या बृहत कृती आराखड्यामध्ये वरील दहा गावांचा समावेश करून तेथे नवीन आरोग्य उपकेंद्रे सुरू करण्यास मंजुरी द्यावी. यासाठी संबंधितांना आपल्या स्तरावरून तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी आ. विवेक कोल्हे यांनी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!