अहिल्यानगर जिल्हाकोपरगाव तालुकाशेवगाव तालुका

शेवगाव–कोपरगावात वाळू तस्करीवर एलसीबीचा छापा!

दोन गुन्हे दाखल; २२ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन्ही प्रकरणांतील आरोपी फरार

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने शेवगाव आणि कोपरगाव येथे कारवाई केली. २१ आणि २२ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एकूण २२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन्ही प्रकरणांतील प्रत्येकी एक आरोपी फरार आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी दोन पथके तयार केली होती. त्यानुसार या पथकांनी शेवगाव आणि कोपरगाव शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकून ही कारवाई केली.

शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८१८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वैजीनाथ रमेश काळे (वय ३१, रा. मुंगी, ता. शेवगाव) आणि विठ्ठल सर्जेराव गव्हाणे (रा. मुंगी, ता. शेवगाव) यांची नावे आरोपी म्हणून नोंदविण्यात आली आहेत. यातील विठ्ठल सर्जेराव गव्हाणे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६०४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अनिल रामदास गायकवाड (वय ३९, रा. मुर्शीदपूर, ता. कोपरगाव) आणि सोनू ऊर्फ सागर पाले (रा. साईधाम पाटी, कोपरगाव) यांची नावे आरोपी म्हणून नोंदविण्यात आली आहेत. यातील सोनू ऊर्फ सागर पाले फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. शेवगाव आणि कोपरगाव येथील या दोन्ही कारवायांमध्ये एकूण २२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!