
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होईल, अशी प्राथमिक घोषणा केली होती. मात्र काही न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे आयोगाने कार्यक्रमात बदल करून मतदानाची तारीख २० डिसेंबर आणि निकालाची तारीख २१ डिसेंबर अशी निश्चित केली.
या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात काल या बदलांविषयी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान खंडपीठाने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल एकाच दिवशी, म्हणजे २१ डिसेंबरला घेता येतील का?दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की, सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरलाच जाहीर करावेत. अगदी मतदान आधी झाले तरीही निकालाची तारीख बदलू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
तसेच न्यायालयाने एक्झिट पोलसंदर्भातही मार्गदर्शन केले. २० डिसेंबरला मतदान प्रक्रिया संपल्यानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोल जाहीर करता येतील, असे न्यायालयाने सांगितले. याचबरोबर, या निवडणुकांसाठीची आदर्श आचारसंहिता २० डिसेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासनाला नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.




