
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यात सोमवारी (दि. १०) सकाळी एक शेळी ठार झाल्याची घटना घडली आहे.येथील वैशाली भास्कर जोशी यांच्या वस्तीवर शेळीवर बिबट्याने हल्ला करून ती ठार केली.घटनेची माहिती मिळताच कोपरगाव वनविभागाचे वनरक्षक सविता थोरात आणि चितळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी बाचकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

परिसरातील नागरिक बिबट्याच्या मुक्त संचारामुळे हैराण झालेले आहेत. सततच्या भीतीमुळे शेतकऱ्यांचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले असून जनावरांसाठी शेतात चारा आणायला जाणे धोकादायक बनले आहे. काही महिन्यांपासून जळगाव परिसरात बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांवर नागरिकांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.यावेळी नानासाहेब जोशी, तुषार चौधरी, गोपीनाथ चौधरी, आबासाहेब जोशी, लक्ष्मण जोशी, आबासाहेब जोशी, राजेंद्र आदमाने, बबन जोशी या शेतकऱ्यांनी वनविभागाकडे बिबट्यांना तातडीने जेरबंद करून नागरिकांना दिलासा द्यावा,अशी मागणी केली आहे.

बिबट्याकडून नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न!
काशीआई मंदिराच्या परिसरात शेतकरी बाबासाहेब चौधरी यांच्या बोराच्या बागेजवळ मादी बिबट्याने नागरिकांचा पाठलाग करून हल्ल्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर नागरिक अधिकच सावध झाले आहेत.वाढत्या बिबट्या उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाने काशीआई मंदिराजवळ पिंजरा बसविला आहे. तरीसुद्धा नागरिकांनी काळजी घ्यावी,असे आवाहन वनरक्षक सविता थोरात यांनी केले आहे.
बिबटे दिसल्यास वनविभागास कळवा!
बिबट्या किंवा त्याची पिल्ले कुठेही दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे.रात्री एकटे बाहेर पडू नये. लहान मुलांना शेतात किंवा घराबाहेर जाऊ देऊ नये. घराच्या समोर पुरेसा प्रकाश ठेवावा. शेतात काम करताना वाकून कामं करू नका.समूहात जावे.हातात काठी, टॉर्च ठेवावी आणि मोठ्या आवाजात बोलावे किंवा गाणे लावावे.
वाड्या वस्त्यावरील नागरिक भीतीच्या सावटात!
गेल्या काही महिन्यांपासून वाड्या वस्त्यावर बिबट्यांचा वावर वाढल्याने आम्हाला सतत भीती वाटते. शेतात जाणे, पाळीव प्राण्यांना बाहेर सोडणे हेही धोकादायक बनले आहे. वनविभागाने ठोस पावले उचलावीत आणि आम्हाला सुरक्षित वातावरण द्यावे.अशी नागरिकांनी मागणी केली.
तातडीने उपाययोजना करा..
जळगाव परिसरात बिबट्यांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण असून, वनविभाग आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.




