बिबट्याचा हल्लामहाराष्ट्र

जळगाव (ता.राहाता) परिसरात मादी बिबट व पिल्लांचा उच्छाद;नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न; परिसरात भीतीचे वातावरण

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता- तालुक्यातील जळगाव परिसरात मादी बिबट्ने मागील काही महिन्यांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.सदर मादी बिबट दुचाकी स्वारांचा पाठलाग करून हल्ला करत असल्याची ताजी घटना घडली आहे. कोपरगाव वनविभागाने तातडीने काशीआई मंदिराच्या परिसरात पिंजरे लावून मादी बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख बाबासाहेब  चौधरी यांनी केली आहे.

 

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जळगाव-शेळके वस्ती रस्त्यावरील काशीआई मंदिरालगतच्या शेतात मादी बिबट व तिची दोन पिल्ले दिसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर मादी बिबट रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांचा पाठलाग करून हल्ला करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, रात्री अपरात्री कोणीही घराबाहेर पडण्यास धजावत नाही. तसेच अनेक वेळा पाळीव प्राण्यांवरती देखील हल्ले करण्यात आले आहे.

 

मादी बिबट आपल्या पिल्लांसह भक्षाच्या शोधात  सायंकाळी बाहेर पडते तसेच नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील करत आहे. सुदैवाने काही दुर्घटना घडल्यास यास कोण जबाबदार राहील असे प्रश्न आता उपस्थित राहत आहेत.जळगाव-शेळके वस्ती मार्गावरून दररोज अनेक शाळकरी मुले आणि नागरिक प्रवास करतात. या परिसरातच बिबट्यांचा वावर असल्याने पालकांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.

 

जळगाव भागात मागील काही वर्षांपासून बिबट्यांचा मुक्त संचार दिसून येत आहे. मात्र, अलीकडच्या काही दिवसांत मानवी वस्तीजवळ बिबट्यांच्या वाढत्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परिसरातील ग्रामस्थांनी एकमुखाने मागणी केली आहे की, कोपरगाव वनविभागाने तातडीने पिंजरे लावून मादी बिबट व तिच्या पिल्लांचा बंदोबस्त करावा, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळू शकेल.

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!