
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील ग्रामपंचायत चितळी हद्दीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीसह दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत व ग्राम पंचायत निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते सोमवार (दि. २७) रोजी सकाळी ठीक १० वाजता पार पडणार असल्याची माहिती चितळीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम यांनी दिली आहे.

सरपंच नारायणराव कदम यांनी माहिती देताना सांगितले की, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, कोपरगावच्या आमदार स्नेहलता ताई कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवून सत्तेत आलो. या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सातत्यपूर्वक प्रयत्न करून सोडविले गावातील विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे.कोल्हे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कायम कटीबद्ध आहोत, असे सरपंच कदम यांनी सांगितले.

दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत व ग्रामपंचायत निधी तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून चितळी गावातील दहन व दफनभूमीची देखभाल, दुरुस्ती व आवश्यक सुविधा पुरविणे, साठवण तलावातील गाळ काढणे, कचरा शेड व विलगीकरण केंद्र उभारणे, चितळी स्टेशन येथील आंबेडकरनगर परिसरात सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता करणे, शहावलीबाबा परिसरात भूमिगत अंतर्गत गटारी बांधणे, चितळी स्टेशन मराठी शाळेची दुरुस्ती, चितळी गावातील सार्वजनिक स्वच्छतागृह व मुतारी बांधणे, बाळासाहेब लांडे ते गायकवाड वस्तीपर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता तयार करणे, मंगल कार्यालय सभागृह, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २३ घरकुले बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, दलित वस्ती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये पथदिवे बसविणे, रस्ता दुरुस्ती, बंदिस्त गटार बांधकाम, समाजमंदिर दुरुस्ती, पाईपलाईन व अंगणवाडी किचन ब्लॉक बसविणे, चितळी प्राथमिक शाळेत डिजिटल बोर्ड बसविणे, स्टेशन व गावठाण परिसरात प्लेविंग ब्लॉक बसविणे, वाचनालय दुरुस्ती व गावातील सर्वत्र पथदिवे बसविणे या कामांचा समावेश करण्यात आला आहे.

या सर्व विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा सोमवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता ग्रामपंचायत मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी चितळी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चितळी ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम, उपसरपंच कविताताई पगारे, ग्रामपंचायत अधिकारी मधुकर आग्रे ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.




