महाराष्ट्र

राहाता–श्रीरामपूर तालुक्यात बिबट्यांचा वाढता कहर; तीन वर्षांत शेकडो हल्ले, जीवितहानीत भर

अपुरे मनुष्यबळ, कमी साधनसामग्री; वनविभागापुढे बिबट्या नियंत्रणाचे आव्हान

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – जिल्ह्यातील कोपरगाव वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत असणाऱ्या राहाता–श्रीरामपूर तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.कोपरगाव वनविभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील तीन वर्षांत या दोन्ही तालुक्यांमध्ये मानव–बिबट्या संघर्षाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

 

वन्यजीव शिकारीच्या शोधात जंगल सोडून मानवी वस्तीकडे येत असून, भक्ष्याच्या शोधात बिबटे केवळ पाळीव जनावरांवरच नव्हे तर थेट मानवावरही जीवघेणे हल्ले करत आहेत. कोपरगाव वनपरिक्षेत्रात गत तीन वर्षांपासून मानवी जीवितहानीसह अनेक गंभीर घटनांची नोंद झाली असून यात बिबट्यांच्या हल्ल्यात २७ नागरिक जखमी झालेत.यासह कोल्हा लांडगा रानडुक्कर हल्ल्यात ८ नागरिक जखमी झाल्याची नोंद आहे.तर सर्वाधिक १,१६९ पशुधनावर हल्ले झाले आहेत. कोपरगाव वनपरिक्षेत्राच्या अधीन राहाता तालुक्यात ५६ गावे, श्रीरामपूर तालुक्यात ६० गावे तर कोपरगाव तालुक्यात ७५ गावे येतात. मात्र तिन्ही तालुक्यांसाठी कर्मचारीसंख्या अपुरी असल्याने घटनेची माहिती वेळेवर मिळूनही वनविभागाला तातडीने कारवाई करता येत नसल्याने बिबट्यांचे निरीक्षण आणि बचाव मोहिमा यावर परिणाम होताना दिसतो.

 

 

ग्रामीण भागात धोका जास्त

शेतशिवारात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक धोका असून सकाळ–संध्याकाळ शेतीकामासाठी बाहेर पडणे धोकादायक ठरत आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल घडवत, रस्त्यांवर किंवा शेतात बिबट्यांचे दर्शन ही आता रोजची बाब झाली आहे. त्यामुळे मानव–वन्यजीव संघर्ष तीव्र होत आहे. शेतकरी व मजुरांना सतत धोका निर्माण होत असून वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

 

 

मानवावर हल्ले; जखमी संख्या अधिक;जीवितहानीत वाढ

श्रीरामपूर तालुक्यात २०२१–२२ मध्ये गळनिंब शिवारात घडलेल्या घटनेत ३ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. तर मोरगेवस्ती परिसरात बिबट्याला रेस्क्यू करताना अधिसंख्य वनमजूर गंभीर जखमी होऊन मृत पावला.राहाता तालुक्यात २०२३-२०२४–२५ मध्ये लोणी, चितळी, धनगरवाडी परिसरातील तीन बालकांचा बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू झाला. लागोपाठ घडलेल्या हल्ल्यांत १० वर्षांखालील तीन बालके बिबट्याच्या भक्षस्थानी सापडली.महाराष्ट्र शासन वनविभागाकडून मृतांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यात आली असली तरी कुटुंबातील सदस्य जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “भरपाई जरी मिळाली तरी गेलेले जीव पुन्हा मिळणार नाहीत,” अशी भावना नातेवाईक व्यक्त करतात.

 

पशुधनावर हल्ले मोठ्या प्रमाणात

गेल्या तीन वर्षांत पाळीव प्राण्यांवर बिबट्यांच्या हल्ल्यांची मोठ्या प्रमाणावर नोंद झाली आहे. एकूण १,१६९ पाळीव प्राण्यांचा बळी गेला असून आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –२०२२–२३ : ३७५ हल्ले,२०२३–२४ : ३१७ हल्ले,२०२४–२५ : ४१७ हल्ले यात शेळ्या, मेंढ्या, कालवडी तसेच पाळीव कुत्र्यांवर सर्वाधिक हल्ले झाले आहेत. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.

 

अपुरे मनुष्यबळ; बचाव कारवाईवर परिणाम

कोपरगाव, राहाता आणि श्रीरामपूर या तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या कोपरगाव वनपरिक्षेत्रात केवळ १ वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रत्येक तालुक्यास १ वनपाल आणि ३ वनरक्षक अशीच नियुक्ती आहे. याव्यतिरिक्त वनपालाचे १ पद रिक्त असून कोपरगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात लिपिक पद मंजूर नसल्याने प्रशासकीय कामकाजात अडचणी येतात.

 

तीन तालुक्यांचा कार्यभार;रॅपिड रेस्क्यू टीमची गरज!

कोपरगाव वनपरिक्षेत्रातील विस्तृत क्षेत्रासाठी फक्त १ पेट्रोलिंग वाहन उपलब्ध आहे. वन्यप्राणी रेस्क्यूसाठी ३७ पिंजरे आहे “कोपरगाव वनपरिक्षेत्रातील वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना लक्षात घेता, घटनास्थळी तात्काळ पोहोचून प्रभावी उपाययोजना करण्यासाठी अत्याधुनिक साधनसामग्रीसह सुसज्ज रॅपिड रेस्क्यू टीमची आवश्यकता आहे.”अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांनी दिली.

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!