महाराष्ट्र

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; जिल्ह्यात भाजपची सह महायुतीची ताकद पुन्हा अधोरेखित;सुजय संग्राम जय वीरूच्या जोडीने केली कमाल

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – विधानपरिषद निवडणुक जागा बिनविरोध करून दाखवत भारतीय जनता पक्षा सह महायुतीने राजकीय पातळीवर महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अपेक्षेप्रमाणे भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध निवडून आले असून, या घडामोडीमुळे जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद आणि राजकीय प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

 

महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र काँग्रेसकडून कोणत्याही अधिकृत उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून राणी लंके यांचे नाव चर्चेत आले होते. त्या अर्ज दाखल करतील, अशी चर्चा होती. मात्र अखेर महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही.अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत भाजपचे प्राजक्त तनपुरे, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे, श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दत्तात्रय पानसरे, तसेच कमलेश गांधी आणि मच्छिंद्र धुमाळ यांचे अर्ज शिल्लक होते. गुरुवारी दुपारपर्यंत मच्छिंद्र धुमाळ आणि कमलेश गांधी यांनी आपले अर्ज मागे घेतले.

 

दरम्यान, काही काळासाठी करण ससाणे हे संपर्काबाहेर गेल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र त्यांनीही अचानक समोर येत आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधातील एकमेव अर्जदार राहिलेले दत्तात्रय पानसरे यांची मनधरणी करण्यात महायुतीला यश आले. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीच्या अखेरच्या काही मिनिटांत त्यांनीही माघार घेतल्याने प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. विशेष म्हणजे, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे हे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील १८ वे आमदार ठरले आहेत.

 

विशेष म्हणजे या संपूर्ण राजकीय घडामोडीत डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या समन्वयाचीही मोठी चर्चा रंगली. उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात दत्तात्रेय पानसरे यांनी अर्ज बळजबरीने किंवा खोट्या सहीने मागे घेतल्याचा आरोप केल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर आमदार संग्राम जगताप आणि दत्तात्रेय पानसरे यांच्यात बंद दाराआड सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर दोघेही एकाच वाहनातून बाहेर पडल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. अखेर पानसरे यांची समजूत काढण्यात यश आले आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडत माघारीची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. या संपूर्ण प्रक्रियेत डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच शेवटच्या क्षणी निर्माण झालेला पेच सुटल्याची चर्चा सुरू असून, राजकीय वर्तुळात या जोडीची तुलना “जय-वीरू” जोडीशी केली जात आहे.

 

या बिनविरोध विजयामागे गेल्या चार दिवसांपासून डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे पार पाडल्याचे मानले जात आहे.यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही प्राजक्त तनपुरे यांना निवडणूक लढविण्यापासून परावृत्त करत अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा करण्यात डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर आता विधानपरिषद निवडणूक बिनविरोध घडवून आणण्यातही त्यांचे योगदान निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.

 

अहिल्यानगर महानगरपालिका आणि जिल्ह्याच्या राजकारणात भाजपची वाढती संघटनात्मक ताकद या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. सर्वपक्षीय समन्वय, संवादकौशल्य आणि संघटन व्यवस्थापनाचेही दर्शन घडविल्याची प्रतिक्रिया राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे. या घडामोडींमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपचे राजकीय वर्चस्व आणखी बळकट झाल्याची चर्चा सुरू असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विजयाकडे महत्त्वपूर्ण राजकीय संदेश म्हणून पाहिले जात आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!