
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर – शहराच्या मध्यवर्ती भागात उघडपणे नशेचे इंजेक्शन विक्री करणाऱ्या तरुणीला श्रीरामपूर शहर पोलिसांनी थेट रंगेहाथ पकडले. तिच्याकडून तब्बल १६ हजार ७४० रुपयांच्या मेफेटरमीन इंजेक्शनच्या ५० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तरुणीसह तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी (१६ ऑगस्ट) दुपारी पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली की, नॉदर्न ब्रँच परिसरात लाल टी-शर्ट व पिवळा स्कार्फ घातलेली एक तरुणी निळ्या रंगाच्या जुपिटर स्कूटीवरून गुंगीकारक औषधांची विक्री करणार आहे. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली पंच व औषध निरीक्षक श्री. मुळे यांच्यासह गोपनीय कारवाई राबवण्यात आली.दुपारी साधारण १.५० वाजता सदर तरुणी स्कूटीवर आल्यानंतर पोलिसांनी तिला थांबवले. झडतीदरम्यान तिच्या स्कुटीच्या डिकीतून मेफेटरमीन इंजेक्शनच्या ५० सीलबंद बाटल्या आढळल्या.

चौकशीत तिने आपले नाव शिल्पा शेळके (रा. गोंधवणी, श्रीरामपूर) असे सांगितले. तिच्याकडे कोणताही औषध विक्री परवाना नसल्याचे समोर आले. ती औषधे परवानगीशिवाय ऑनलाईन खरेदी करून विना बिलाने बाजारभावापेक्षा दुप्पट दराने विकत असल्याचे निष्पन्न झाले. एका बाटलीची किंमत ३३४ रुपये असताना ती ७०० रुपयांना विकली जात होती.तसेच, ही औषधे विक्री करण्यासाठी सदर मुलीचा मित्र गणेश मुंडे (रा. स्वप्ननगरी, गोंधवणी) प्रत्यक्षरित्या मदत करत असल्याचे उघड झाले.असून स्थानिक जिममध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना व इतर ग्राहकांना ही औषधे पुरवली जात होती अशी माहिती मिळाली आहे.
मेफेटरमीन इंजेक्शनचा वैद्यकीय उपयोग रक्तदाब कमी झाल्यास केला जातो. मात्र, त्याचा गैरवापर शरीराची क्षमता वाढविण्यासाठी होत असून गंभीर आरोग्यदायी दुष्परिणाम होऊ शकतात. औषध निरीक्षक श्री. मुळे यांच्या माहितीनुसार, या इंजेक्शनचा चुकीचा वापर केल्यास झोप येणे तसेच जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.या प्रकरणी पुढीचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.




