महाराष्ट्र

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मिळालेल्या;ई-घंटागाडीची वरात थेट सर्व्हिस सेंटरच्या दारात?

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

चितळी – स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जळगाव ग्रामपंचायला मिळालेली मात्र मागील दीड वर्षांपासून धूळ खात बंद पडलेल्या ई-घंटा गाडीची वरात अखेर सर्व्हिस सेंटरकडे रवाना करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 

जळगाव ग्रामपंचायतीला सन 2022-23 मध्ये मिळालेली ई-घंटा गाडी मागील दीड वर्षांपासून कुठलाही वापर न करता एका ठिकाणी उभी ठेवण्यात आली होती.या प्रकरणी काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची कानउघडणी झाल्यानंतर संबंधित ई-घंटा गाडी बंद अवस्थेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून उभी करण्यात आली होती.मात्र संबंधित घंटागाडी ग्रामपंचायत समोर उभी करून ग्रामपंचायत प्रशासन तोंडावर पडलेले होते.नुकतीच संबंधित कंपनी कडुन घंटागाडीची उचलबांगडी करण्यात आली असून मागील दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून ई-घंटा गाडीमार्फत होणारे कचरा संकलन बंद असल्यामुळे गावातील स्वच्छ भारत अभियान पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.मात्र आता संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने ही घंटागाडी तेथून हलवू थेट कंपनीकडे सर्व्हिसिंगसाठी पाठवल्याची माहिती मिळाली आहे.

 

विशेष म्हणजे जळगाव ग्रामपंचायत प्रशासनाने मध्यंतरी गावातील बहुतेक कुटुंबांना ओला व सुका कचरा संकलनासाठी शासनाच्या निधीतून लाखो रुपयांचे डस्टबिन खरेदी करून वाटप केल्याची माहिती मिळते.मात्र गावात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविली जात नसेल तर केवळ डस्टबिन वाटपाचा कळवळा कशाला हवा?असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.गावाच्या विकासासाठी नागरिकांनी निवडून दिलेल्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करत बंद पडलेल्या ई-रीक्षेकडेही कानाडोळा केल्याची बाब कटू सत्यच असून,प्रत्यक्षात असे घडले नसते तर आज गावातील कचरा संकलन व्यवस्था सुरळीतपणे सुरू असायला पाहिजे होती.

 

ग्रामपंचायत प्रशासनाने मागील दीड वर्षांच्या कार्यकाळातच बंद पडलेली ई-घंटा गाडी सुरू करण्यासाठी सर्व्हिस सेंटरसोबत तत्परतेने समन्वय साधणे आवश्यक असतानाही तसे घडले नाही.खरं तर या संपूर्ण प्रकरणात ग्रामपंचायतीचा चालढकलपणा अंगलट आल्याचे दिसून आले.वेळीच दुरुस्ती होणे महत्त्वाचे असतानाही रिक्षा दुरुस्त करण्यात आली नाही. उलट संबंधित घंटा गाडी ग्रामपंचायत परिसराऐवजी नियमबाह्यपद्धतीने अन्य ठिकाणीच पडून होती.या विलंबामुळे ई-रिक्षाचे पत्रे अक्षरशः सडू लागले होते.बॅटरी निकामी झाली होती. तसेच वायरिंग कुरतडून टाकल्याची माहितीही समोर आली होती.शासनाने लाखो रुपये खर्च करून दिलेली वस्तू जपणे आणि तिचा योग्य वापर करणे हे ग्रामपंचायतीचे कर्तव्य असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

 

 

गटविकास अधिकारी विवेक गुंड साहेब,तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे लक्ष द्या!

राहाता तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेले प्रशासक किंवा सचिव नागरिकांशी संवाद साधताना टाळाटाळ करतात.ग्रामपंचायत स्थरावरील खरी माहिती लपवतात.ग्रामपंचायत ही गावपातळीवरील सर्वात महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था मानली जाते.त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांना वेळेत आणि पारदर्शकपणे उत्तर देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.काही ठिकाणी नागरिकांना साध्या प्रश्नांचीही सरळ भाषेत उत्तरे दिली जात नाहीत.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!