
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – अखंड महाराष्ट्रासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील जागृत धार्मिक स्थळ म्हणून ख्याती असलेल्या वाकडी (ता. राहाता) येथील श्री.खंडोबा देवस्थान ट्रस्ट येथे रविवार (दि.२९) ह.भ.प. उद्धवजी महाराज मंडलिक (नेवासेकर) यांनी सदिच्छा भेट देऊन श्री.खंडोबा देवाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी श्री.खंडोबा मंदिर परिसरात ‘आरती मंडळाने’ सुरू केलेल्या अन्नदान सेवेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. श्री.खंडोबा देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ आणि अन्नदान सेवा देणाऱ्या भाविक भक्तांचे त्यांनी आभार मानले. राज्यभरातून तसेच राज्याबाहेरून येणाऱ्या वाकडीतील खंडोबा देवस्थान ट्रस्ट भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या प्रसंगी त्यांनी श्री.खंडोबा मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सुरू असलेल्या विकासकामांबाबत समाधान व्यक्त करत, भक्तांसाठी होत असलेल्या सुविधा उपयुक्त व कौतुकास्पद असल्याचे उद्धव महाराज मंडलिक महाराजांनी सांगितले.
या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट, आरती मंडळ व भजनी मंडळाच्या वतीने उद्धवजी महाराज यांचा सत्कार व संतपूजन करण्यात आला. वाकडी गावात ब्रह्मलिन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद लाभलेले असून, किर्तनासाठी गावकऱ्यांकडून नेहमीच आग्रह असतो.
ह.भ.प. उद्धवजी महाराज मंडलिक (नेवासकर ) यांची महाराष्ट्र राज्य वारकरी किर्तनकार गोलमेज परिषद सुकाणू समितीवर निवड झाल्याबद्दल गावात विशेष आनंद व्यक्त करण्यात आला. यानिमित्त त्यांचा वाकडी ग्रामस्थांच्या वतीने गौरव करण्यात आला.
