
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील चितळी ते श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.या कामात मोठा अपहार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून,सार्वजनिक बांधकाम विभागात अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने गोंडेगाव येथील डॉ. सुजयदादा विखे पाटील युवा मंचचे अध्यक्ष अमोल तांबे यांनी सोमवार (दि. 20 एप्रिल) पासून गोंडेगावातील हनुमान मंदिरात बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.आज उपोषणाचा तिसरा दिवस असून,अमोल तांबे यांची शुगर लेव्हल कमी झाल्यामुळे त्यांची प्रकृती खालावलेली दिसून आली आहे.

दरम्यान,२२ एप्रिल रोजी सकाळी गोंडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली आहे.मात्र उपोषणाचा तिसरा दिवस सुरू असतानाही संबंधित अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी भेट देण्याचे टाळल्यामुळे गावात खंत व्यक्त केली जात आहे.सदर रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असल्याची माहिती काही स्थानिक पुढाऱ्यांनाही होती, मात्र त्यांनी काम सुरूच ठेवू दिल्याचा आरोप अमोल तांबे यांनी केला आहे.आमरण उपोषणा दरम्यान जीवितास काही बरे वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे त्यांनी जाहीर केले आहे.
आर्थिक संकल्प 2022-23 अंतर्गत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून चितळी ते गोंडेगाव रस्त्यासाठी 3 कोटी 58 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.अंदाजे तीन महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत ग्रामस्थांनी ठेकेदाराला वारंवार सूचना दिल्या होत्या, मात्र ठेकेदाराने याठिकाणी कोणतीही सुधारणा केली नाही. प्रशासनाने रस्त्याचे अंदाजपत्रक इस्टिमेट सह तांत्रिक माहिती नागरिकांना दिलेली नाही. याबाबत ६ एप्रिल रोजी निवेदन देऊनही कुठल्याही उपाययोजना झालेल्या नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
श्रीरामपूर येथील ठेकेदाराने रस्तेकामात चालढकलपणा केला असून ग्रामस्थांकडून येणाऱ्या तक्रारींकडे साफ दुर्लक्ष केले असून, सार्वजनिक बांधकाम विभागालाही निवेदन देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.परिणामी,कोट्यवधी रुपयांचे काम नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली असली तरी, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ठेकेदाराला निकृष्ट काम करण्याचे अभय मिळाल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कामाला विरोध करण्यासाठी अमोल तांबे यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.त्यांना चितळी- गोंडेगाव ग्रामस्थांनी पाठिंबा दिलेला असून सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी या तक्रारीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.




