
( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर – शहरात पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने मटका जुगाराविरोधात मोठी कारवाई केली. दि. २७ जून २०२५ रोजी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहरातील मुळा प्रवरा वीज सोसायटीजवळ छापा टाकून दोन मुख्य मटका बुकीसह एकूण २२ आरोपींना अटक करण्यात आली.
कारवाईदरम्यान मुनीर इमाम पठाण (रा. सुभेदार वस्ती) व अभिजीत मुथा (रा. बेलापूर रोड) हे दोघे मुख्य बुकी म्हणून निष्पन्न झाले. त्यांच्या सोबत इतर २० आरोपी जुगार खेळताना व बुकींग घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या छाप्यात १,३३,२६० रुपये रोख, २,२४,३०० रुपये किंमतीचे मोबाईल, ४,८०,००० रुपये किंमतीची वाहने, २४,००० रुपये किंमतीचा प्रिंटर आणि मटका जुगाराचे साहित्य असा एकूण ८,६१,५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींची नावे तपशीलवार नोंदवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील मटका जुगाराच्या रॅकेटवर मोठा आळा बसला आहे.
याच दिवशी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.संतोष खाडे यांनी शहरातील गांधी पुतळा ते भगतसिंग चौक, गिरमे चौक ते शिवाजी चौक परिसरात वाहतूक शिस्त मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे हटवण्यात आली.
सदरची कामगिरी मा.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर; श्री. वैभव कलुवर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर विभाग; श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर; व श्री. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाचे प्रभारी मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, सहायक फौजदार शकील शेख, पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर चौधरी, अजय साठे, अरविंद भिंगारदिवे, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनिल पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल दिघे, अमोल कांबळे, विजय ढाकणे, दिपक जाधव आणि जालिंदर दहिफळे यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला असून पुढील तजवीज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
