महाराष्ट्र

दुध उत्पादकांचे रखडलेले अनुदान तातडीने द्या;अन्यथा तिव्र आंदोलन – विठ्ठलराव शेळके

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – दुधाचे रखडलेले अनुदान तातडीने दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.

 

दुध उत्पादक शेतकरी आज आर्थिक अडचणीत सापडले आहेत.चारा, पशुखाद्य,औषधे यांचे दर प्रचंड वाढलेले असताना, शासनाने जाहीर केलेले प्रती लिटर ७ रुपये अनुदान अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही.

 

मागील वर्षी शेतकरी संघटनेनेच राज्यभर आंदोलन करून दुध दर प्रती लिटर ४० रुपये मिळावा यासाठी लढा दिला होता. त्यानंतर सरकारने प्रती लिटर ५ रुपये आणि नंतर ७ रुपये अनुदान जाहीर केले. मात्र जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे अनुदान दिले गेले असले तरी इतरत्र काही दूध संस्थांच्या चौकशीचे कारण देत पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी जाणूनबुजून अनुदान रखडवत आहेत.

 

या प्रक्रियेत दुध उत्पादक शेतकरी भरडला जात असून, संस्था चालक आणि दुध प्लँटचे मालक मात्र मजेत असल्याचे शेळके यांनी सांगितले. जर संस्थाचालकांनी काही गैरव्यवहार केले असतील, तर त्याची चौकशी स्वतंत्रपणे करावी, मात्र त्याचा फटका शेतकऱ्यांना लागू देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदीसाठी निधीची नितांत गरज आहे. त्यामुळे आठ दिवसांच्या आत रखडलेले अनुदान जमा करावे, अन्यथा शेतकरी संघटना व दुध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा शेळके यांनी दिला आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!