(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी-महिलांच्या उन्नतीसाठी आज केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आहे. महिला सक्षमीकरण विधेयकाच्या माध्यमातून महिलांना आता शेतकरी म्हणून सन्मान मिळत आहे. अहिल्यानगर जिल्हा हा महिला शेतकरी प्रमाणपत्र वितरणात पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे राज्यात आघाडीवर ठरला असून महिलांनी आता उद्योजकतेकडे वळावे आणि यासाठी आपल्याला कृषी विज्ञान केंद्र सह जनसेवा फौडेशनच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण उपलब्ध होणार आहेत या प्रशिक्षणातून माहिती घेऊन महिलांनो व्यावसायिक व्हा.. पुढे जा आणि आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या गावाला पुढे न्या आणि यातून आपली प्रगती साध्य करा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
ग्रामीण भागातील महिला बचत गटांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे आयोजित दोन दिवसीय मसाले निर्मिती प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले. या प्रशिक्षणात राहाता, राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यांतील ६० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. उत्तमराव कदम तसेच पायरेन्सचे सचिव तथा संचालक डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान श्री. भगवान गिरी यांनी विविध प्रकारच्या मसाल्यांची निर्मिती, कच्च्या मालाची निवड, स्वच्छता व प्रक्रिया, मसाल्यांचे योग्य प्रमाणात मिश्रण, पॅकिंग आणि साठवणूक याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मसाले निर्मिती व्यवसाय सुरू करून आर्थिक उत्पन्न कसे वाढविता येईल, याची माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात आली.प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ.उत्तमराव कदम आणि प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, महिलांनी प्रशिक्षणातून मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःच्या व्यवसायाची उभारणी करावी. उपलब्ध संसाधने आणि कौशल्यांच्या आधारे स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून उद्योगशील बनावे आणि आर्थिक स्वावलंबन साध्य करावे. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचे काम पाहिला जिल्ह्यामध्ये होत आहे. आज विविध स्तरावरती सुरू असलेल्या प्रयत्नामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला सक्षमीकरण धोरणामुळे महिला या विकासाच्या मुख्य प्रवाहात आल्या आहेत याचा लाभ घेत महिलांनी पुढे जावे आणि बचत गटातून आणि संघटित होऊन आपले प्रगती साध्य करावी असे सौ. विखे पाटील म्हणाल्या.
डॉ. उत्तमराव कदम यांनी महिलांसाठी कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देत विविध प्रशिक्षणाचा महिलांनी लाभ घेऊन व्यावसायिक व्हावे आणि यासाठी आपल्याला कृषी विज्ञान केंद्र हे कायमच मद्दत करेल असे सांगितले.या प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विलास घुले, डॉ. विठ्ठल विखे, कैलास लोंढे,निता कांदळकर, सौ. गायत्री म्हस्के, सौ. संगीता मोरे आणि ऋषिकेश पडोळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.सज्जला लांडगे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विस्तार विभागाच्या डॉ. प्रियंका खर्डे यांनी केले.