(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – अहिल्यानगरच्या राजकीय, सहकार आणि कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास एकनाथ कोतकर यांचे शनिवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. सकाळी हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना अहिल्यानगर येथील आनंदऋषीजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळासह सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
भानुदास कोतकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. राजकारणासोबतच उद्योग क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला. ते संदीप उद्योग समूहाचे संस्थापक होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देणे आणि बाजार समितीच्या विकासासाठी प्रयत्न करणे, यामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. नगर तालुक्यातील नेप्ती उपबाजार समितीच्या उभारणीतही त्यांची भूमिका आहे.
भानुदास कोतकर हे अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौर संदीप कोतकर यांचे वडील, तर महापौर सुवर्णा कोतकर यांचे सासरे होते. त्यांच्या निधनामुळे कोतकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या निधनाने अहिल्यानगरच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत असून, राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील व्यक्तींकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.