(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कोपरगावच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे. शेतीपूरक व शेतीमाल प्रक्रिया मतदारसंघातून आमदार आशुतोष काळे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता असताना, सुधीर रावसाहेब म्हस्के यांनी निवडणुकीच्या रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काळे यांच्या बिनविरोध निवडीचे स्वप्न भंगले असून, या मतदारसंघात आता थेट लढत होणार आहे.
या मतदारसंघातून एकूण २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी २६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आमदार आशुतोष काळे आणि सुधीर म्हस्के यांचे अर्ज शिल्लक राहिले. काळे यांच्यासाठी इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र होते. मात्र, म्हस्के यांनी माघार न घेतल्याने निवडणुकीतील चुरस कायम राहिली.
अर्ज माघारीच्या दिवशी सुधीर म्हस्के अहिल्यानगर येथे उपस्थित होते. त्यांनी अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविल्याची चर्चा होती. मात्र, माघार घेण्यासाठी पुढे जाण्यापूर्वी त्यांना एक फोन आला आणि त्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. हा फोन नेमका कोणाचा होता, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नसली, तरी या एका घडामोडीने कोपरगावच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
विखे-थोरात युती विरुद्ध लंके-लोखंडे गट
या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे हे विखे-थोरात युतीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील सुधीर रावसाहेब म्हस्के हे लंके-लोखंडे गटाकडून मैदानात उतरले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या या मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची ठरण्याची शक्यता आहे.
म्हस्के कुटुंबाचे विखे यांच्याशी जुने राजकीय वैर
सुधीर म्हस्के यांचे वडील रावसाहेब म्हस्के यांनी यापूर्वी राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे म्हस्के कुटुंब आणि विखे यांच्यातील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी या निवडणुकीलाही आहे. सुधीर म्हस्के हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाशी संबंधित आहेत, तर आमदार आशुतोष काळे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात आहेत.
त्यामुळे शेतीपूरक व शेतीमाल प्रक्रिया मतदारसंघातील ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील लढत म्हणूनही महत्त्वाची मानली जात आहे. बिनविरोध निवडीच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना सुधीर म्हस्के यांच्या निर्णयामुळे खीळ बसली असून, आता या मतदारसंघात कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकीचा अंतिम निकाल मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.