कोपरगाव तालुका

ऊस तोडणी कामगारांनी आरोग्याची काळजी घ्यावी-डॉ.विकास घोलप

कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर ऊसतोडणी कामगारांसाठी ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 

कोळपेवाडी – ऊस तोडणी काम हे शारीरिकदृष्ट्या अत्यंत कठीण व तणावपूर्ण असते. कडाक्याची थंडी असेल किंवा उन्हाळ्याच्या तीव्र झळा असतांना देखील ऊस तोडणी कामगार ऊस तोडणीचे काम करीत असतात. या मेहनतीच्या व अती कष्टाच्या कामामुळे ऊस तोडणी मजुरांची आरोग्याची स्थिती अनेकदा गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांनी नियमितपणे आपल्या आरोग्याची तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन कोपरगाव तालुका आरोग्याधिकारी डॉ. विकास घोलप यांनी केले आहे.

 

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र, चासनळी यांच्या सहकार्याने कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस तोडणी कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून २०० ऊस तोडणी कामगारांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे होते.

 

ऊस तोडणी मजुरांची व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्या निर्देशानुसार बुधवार (दि.१५) रोजी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊस तोडणी कामगारांच्या वसाहतीमध्ये मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे याच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे म्हणाले की, ऊस तोडणी कामगार साखर कारखान्याच्या गळीत हंगामात महत्वाचा घटक आहे. ऊसतोड कामगारांना ऊस तोडीच्या अतिशय कष्टाच्या कामामुळे स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे भविष्यात मोठ्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. हे धोके टाळण्यासाठी कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक मा. आ. अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराच्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांची आरोग्य तपासणी करून तपासणी अंती निदान झालेल्या आजारांवर मोफत औषधोपचार केले जातात. ऊस तोडणी कामगारांनी व त्यांच्या कुटुंबांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेवून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. या आरोग्य शिबिरात ऊस तोडणी कामगारांचे रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबीन, गरोदर महिलांची व लहान मुलांची तपासणी करण्यात येवून सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी आदी आजारांवर मोफत औषधोपचार करण्यात आले.

 

या मोफत आरोग्य तपासणी शिबीर प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असी.सेक्रेटरी संतोष शिरसाठ, मुख्य शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे, डॉ. एस.आर.जैन, ऊस विकास अधिकारी ए.आर.चिने, चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुषमा सांजेकर, सहाय्यक श्रीम. अरुणा गाताडे, आर.एस.शेख तसेच आरोग्य निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

       

 

 

 

जाहिरात

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!