
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी जळगाव ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यपदांची आरक्षण सोडत बुधवार (दि. १० जून) रोजी रोकडोबा मंदिरासमोर आयोजित विशेष ग्रामसभेत जाहीर करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महिलांना ५० टक्के आरक्षण लागू असून त्यानुसार रचना निश्चित करण्यात आली.
एकूण ११ पैकी ६ जागा महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुकांच्या निवडणूक लढविण्याच्या आशांवर पाणी फिरले. पुणतांबा महसूल मंडळाचे मंडळाधिकारी हेमंत डहाळे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. महिला आरक्षणाच्या मुद्यावरून ग्रामसभेत काही काळ गोंधळ निर्माण झाला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सतीश दिघे, तलाठी प्रमोद गायकवाड, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय गटांचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षणाची माहिती जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधी गटातील सदस्यांनी महिलांसाठी एवढे आरक्षण कसे निश्चित झाले तसेच विशेष ग्रामसभा घेण्याची आवश्यकता काय होती, असे प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला. यावरून काही काळ प्रशासन व राजकीय गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले.दरम्यान, ही आरक्षण सोडत केवळ ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यपदांपुरतीच मर्यादित होती. सरपंचपदासाठी कोणतीही आरक्षण सोडत काढण्यात आलेली नसून, सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याची चर्चा आहे.
यावेळी मंडळाधिकारी हेमंत डहाळे यांनी आरक्षण प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार तसेच शासनाच्या नियमांनुसार पार पडत असल्याचे स्पष्ट केले. उपस्थितांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित होत असल्याने त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर परिस्थिती शांत झाली.
सोडतीनुसार प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष/महिला, प्रभाग क्रमांक २ मध्ये ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष/महिला, प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जमाती महिला, ओबीसी पुरुष/महिला व सर्वसाधारण पुरुष/महिला, तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष/महिला अशी आरक्षण रचना निश्चित करण्यात आली आहे.
आरक्षणाच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसी प्रवर्गासाठी प्रत्येकी एक महिला जागा, ओबीसीसाठी एक जागा (पुरुष/महिला), सर्वसाधारण प्रवर्गासाठी तीन महिला जागा आणि चार पुरुष/सर्वसाधारण जागा निश्चित करण्यात आल्या आहेतएकूण ११ सदस्यपदांपैकी ६ जागा महिलांसाठी तर ५ जागा पुरुष/खुल्या प्रवर्गासाठी राखीव राहणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीत महिलांचे प्रतिनिधित्व ५४.५५ टक्के तर पुरुषांचे ४५.४५ टक्के राहणार आहे.
महिला आरक्षणामुळे निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या अनेक इच्छुकांची हिरमोड झाली असून, अनेकांना आता नव्याने राजकीय गणिते मांडावी लागणार आहेत. सुमारे दीड ते दोन तास चाललेल्या या विशेष ग्रामसभेनंतर आरक्षणाचे अंतिम चित्र स्पष्ट झाले असून, गावातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध गटांनी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याची चर्चा ग्रामसभेनंतर रंगली.




