(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
बीड – कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच एका रिक्षाचालकाकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा प्रकार गेवराई येथे उघडकीस आला आहे. जप्त केलेली रिक्षा सोडून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) ही कारवाई करण्यात आली.
सहायक पोलीस उपनिरीक्षक नितीन संताराम शिंदे (वय ४८, रा. शाहूनगर, बीड) आणि पोलीस हवालदार रामराव केशव आघाव (वय ४६, रा. शिक्षक कॉलनी, बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी एका रिक्षाचालकाची रिक्षा रस्त्यावर उभी केल्याच्या कारणावरून पोलिसांनी ताब्यात घेतली होती. ही रिक्षा सोडवून घेण्यासाठी चालकाने प्रयत्न केले असता, सहायक पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांच्यासाठी पोलीस हवालदार रामराव आघाव यांनी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
लाचेची मागणी झाल्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. मात्र, पोलिसांना संशय आल्याने लाचेची रक्कम स्वीकारण्यात आली नाही.
तरीही लाचेची मागणी आणि उपलब्ध रेकॉर्डिंगसह इतर पुराव्यांच्या आधारे दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन शिंदे याला बीड येथील राहत्या घरातून, तर रामराव आघाव याला गेवराई पोलीस ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले.बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.