(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर – अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील भोकर–भामठाण रस्त्यावरील शेतात असलेला महावितरणचा १०० केव्हीए क्षमतेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची कॉपर कॉईल आणि ऑईल असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील सुमारे २० शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरची वीजजोडणी तोडून त्याचे नट-बोल्ट उघडले. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची कॉपर कॉईल आणि ऑईल चोरून नेले. या चोरीत सुमारे १४० किलो तांब्याची तार चोरीला गेल्याचेही सांगण्यात आले आहे.
रात्री अचानक वीजपुरवठा बंद झाल्याने सुरुवातीला शेतकऱ्यांना तांत्रिक बिघाड झाल्याचा अंदाज आला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रान्सफॉर्मरची पाहणी केली असता त्यातील साहित्य चोरीला गेल्याचे उघडकीस आले.
ट्रान्सफॉर्मरमधील साहित्य चोरीला गेल्याने महावितरणचे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरातील सुमारे २० शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शेतीला पाणी देण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आधीच शेतीसमोर विविध संकटे असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
महावितरणचे सहाय्यक अभियंता सुरेश पाडसवान यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करून चोरट्यांचा शोध घेणे आणि चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान आहे.
ग्रामीण भागातील शेतांमध्ये असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुर्गम भागातील ट्रान्सफॉर्मर चोरट्यांकडून लक्ष्य केले जात असल्याने अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.परिसरातील सुदाम पटारे, डी. एस. पटारे यांच्यासह शेतकऱ्यांनी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि बंद पडलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. या मागणीची दखल घेऊन पोलिस प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.